रेकॉर्ड ब्रेक मतांनी आपल्या आमदारांना विजयी करा -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
उरण : प्रतिनिधी
महेशजी या निवडणुकीत तुमचा विजय निश्चित आहे, मात्र आता नुसता विजय नको तर रेकॉर्ड ब्रेक करा. विकासकामांच्या जोरावर रेकॉर्ड ब्रेक मतांनी आमदार महेश बालदी यांना विजयी करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व विद्यमान आमदार महेश बालदी यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि. 29) जोरदार शक्तिप्रदर्शन करीत दाखल करण्यात आला. त्यानिमित्ताने झालेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, श्री शिव समर्थ स्मारकाच्या उद्घाटनाला मी या ठिकाणी आलो होतो. त्या वेळी ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आशीर्वाद मागितला होता. हा परिसर आता विकासकामांनी बदलून गेला आहे. या भागात रेल्वे पोहचली, अनेक विकासाचे प्रकल्प सुरू झाले. पागोटे ते चौक साडेचार हजार कोटींचा रस्ता मंजूर झाला आहे. तिसर्या मुंबईतून हा हायवे आहे. त्यामुळे बंगळुरूपर्यंतचा प्रवास कमी वेळेत पूर्ण करता येणार आहे. एवढा बदल या ठिकाणी होणार आहे.
येथे झालेली सर्व कामे माझ्यामुळे नाही, तर आमदार महेश बालदी यांच्यामुळे झाली. त्यांना या कामाचे श्रेय द्यावे लागेल. आता या भागाचा प्रत्येक प्रश्न मार्गी लागला आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जेट्टी, येथील शेतकर्यांना साडेबारा टक्क्याचा परतावा मिळावा यासाठी आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर हे माझ्याकडे आले. त्यांनी याबाबत समस्या मांडली. त्यानंतर तेही मार्गी लागले. येथे रस्ते, रेल्वे आली. या भागातील लोकांना रोजगार मिळाला आहे. हे चित्र बदलण्याचे काम आमदार महेश बालदी यांनी केले आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री गडकरी यांची त्यांचे कौतुक केले.
येथील विकासकामांसाठी अनेक निवेदन आमदार महेश बालदी यांनी माझ्याकडे दिली. त्यामुळे या भागाचा अतिशय वेगाने विकास होत आहे, असे सांगून नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि.बा. पाटील यांचे नाव दिले पाहिजे, कारण त्यांनी येथील शेतकरी लढे उभारले आहेत, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आवर्जून सांगितले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी दोघांनी मिळून या भागाचा विकास साधला आहे. या भागातील आदिवासी बांधवांना त्यांच्या मालकीची हक्काची घरे मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असेही ना. गडकरी यांनी स्पष्ट केले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंढे, शिवसेनेचे रूपेश पाटील यांनीही उपस्थितांना संबोधित करून आमदार महेश बालदी यांना विजयी करण्याचे आवाहन केले, तर आमदार महेश बालदी यांनी केेलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडत यापुढील काळात अधिक कामे करण्यासाठी तुमचा आशीर्वाद द्यावा, असे म्हटले.
या वेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरणचे तालुका अध्यक्ष रवी भोईर, खालापूरचे तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, उरणच्या माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, भाजप शहराध्यक्ष व माजी नगरसेवक कौशिक शाह, उद्योगपती पी.पी. खारपाटील, राजेंद्र खारपाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष परिक्षित ठाकूर, वैजनाथ ठाकूर, माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, जीवन गावंड, विजय भोईर, कुंदा ठाकूर, भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, सुषमा म्हात्रे यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.