
मामल्लापुरम : वृत्तसंस्था
‘चेन्नई कनेक्ट’द्वारे भारत आणि चीन यांच्या संबंधांतील नवे युग सुरू झाले आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदी यांनी गेल्या दोन दिवसांत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत विविध सत्रांमध्ये सुमारे साडेपाच तास चर्चा केली. त्यानंतर द्विपक्षीय संबंधांबाबत शनिवारी मोदी यांनी भूमिका व्यक्त केली. अनौपचारिक बैठकीत मोदी यांनी शी जिनपिंग यांच्यासोबत शिष्टमंडळ पातळीवरील चर्चा केली. कोवालम येथील रेसॉर्टमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या बैठकांचा शनिवारी शेवटचा दिवस होता. भारत आणि चीन गेल्या दोन हजार वर्षांपासून जागतिक आर्थिक सत्ता असल्याचेही मोदी यांनी सांगितले. ‘वुहान येथील परिषदेनंतर दोन्ही देशांच्या संबंधांना नवी गती आणि विश्वास मिळाला. ’चेन्नई कनेक्ट’द्वारे दोन्ही देशांतील सहकार्याचे नवे युग आज सुरू होत आहे,’ असे मोदी म्हणाले. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या वर्षी चीनमधील वुहान शहरात पहिली अनौपचारिक चर्चा झाली होती. वुहान समिटनंतर दोन्ही देशांतील धोरणात्मक संवाद वाढल्याचेही मोदी म्हणाले. ‘आम्ही मतभेद समजूतदारपणे हाताळले आणि त्यावरून वाद होऊ दिला नाही. एकमेकांच्या चिंतेच्या विषयांबद्दल संवेदनशील राहण्याचे आम्ही ठरवले आहे,’ असेही मोदी यांनी सांगितले. शिष्टमंडळ पातळीवरील चर्चेपूर्वी जिनपिंग आणि मोदी यांनी ‘फिशरमन्स कोव्ह रेसॉर्ट’ येथे तासभर चर्चा केली. यातून दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध बळकट करण्याचा संदेश दिला. समुद्रकिनारी असलेल्या चर्चेच्या ठिकाणी दोन्ही नेते गोल्फ काटर्रमध्ये बसून दाखल झाले. दरम्यान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन्ही देशांतील तिसर्या अनौपचारिक चर्चेसाठी पुढील वर्षी चीनला येण्याचे आमंत्रण दिले. मोदी यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे.