नागपूर : प्रतिनिधी
राज्याच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच आता सर्वच पक्षांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या आहेत. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात पहिली सभा पार पडली. या वेळी त्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. शंभर कोल्हे जरी एकत्र आले तरी सिंहाची शिकार करू शकणार नाहीत, असं म्हणत त्यांनी या वेळी विरोधकांना टोला लगावला.
माझ्या विरोधात पळपुटा उमेदवार उभा केला, नितीन गडकरी यांच्या विरोधात पळपुटा उमेदवार उभा केला, अशा पळपुटांना आमच्या विरोधात का उभं करता, असा सवाल फडणवीस यांनी या वेळी केला. आमच्या विरोधात लढण्यासाठी चांगले पैलवान उभे करा, असं आवाहनही त्यांनी या वेळी केलं. 100 कोल्हे जरी एकत्र आले तरी ते सिंहाची शिकार करू शकणार नाहीत, असं म्हणत त्यांनी आशिष देशमुख यांनाही टोला लगावला.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांना दिलेल्या कर्जमाफीचा उल्लेखही केला. आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने दिली. त्याचं काम अद्यापही सुरू आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये शेतकरी हिताच्या अनेक योजना सरकारने राबवल्या. पाच वर्षांमध्ये 50 हजार कोटींची विकासकामं करण्यात आली, तसेच राज्यातील अनेक सिंचन प्रकल्पही पूर्णत्वास नेण्यात आले, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आम्ही या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरलो आहोत, परंतु या निवडणुकीत मजाच येत नाही. लहान मुलाला देखील या निवडणुकीचा निकाल काय येईल याची कल्पना आहे. काँग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष हताश आणि निराश आहेत. आमच्या विरोधात त्यांनी उमेदवारही उतरवले नाहीत, असं म्हणत फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.