मोहोपाडा ः वार्ताहर
रसायनी पाताळगंगा परिसरातील कैरे शिवाजीनगर येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून तिला मारण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याने अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी मोठ्या शिताफीने त्या नराधमाच्या मुसक्या आवळून त्याला जेरबंद केले आहे.
न्यायालयाने त्याला बुधवार (दि. 16)पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कैरे शिवाजीनगर येथे पीडित मुलीची आई मयत असून ती व तिचा मोठा भाऊ हे तिच्या आईचे दुसरे पती यांच्यासोबत राहते. तिच्या सावत्र वडिलांचा मित्र प्रभाकर महादू रायकर उर्फ कालूराम (वय 35) रा. शिवाजीनगर, कैरे यांचे घरी येणे-जाणे असायचे. कपडे धुण्यासाठी शिवाजीनगर येथील डोंगराजवळ असणार्या झर्याच्या पाण्यावर ती गेली असता नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग केला. दिवस गेल्यानंतर तपासणी केल्यावर प्रकार उघड झाला.