पोओके अर्थात पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. काल पाच मजुरांची हत्या झाली. शाळेवर गोळीबार झाला. पीओके ताब्यात आला तरच हे थांबेल. पीओके हा आपला अंतर्गत प्रश्न आहे, हे भारताने स्पष्ट सांगितले आहे आणि चीननेही त्यात मध्यस्थी करण्याची मागणी केली नाही. तो ताब्यात घेताना एक लक्षात ठेवले पाहिजे की तेथील गिलगीट बाल्टीस्तानमधून पाकिस्तान-चीन आर्थिक परिक्षेत्राचा मार्ग जात आहे. अलीकडेच भारतीय लष्कराने पाकिस्तानवर तोफगोळ्यांचा मारा करून पीओकेतील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यानंतर करण्यात आलेला बालाकोटचा एअर स्ट्राइक यानंतर आता भारतीय लष्कराकडून करण्यात आलेली ही कारवाई या तीनही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामधून भारताच्या संरक्षणाबाबत बदललेल्या भूमिकेचा प्रत्यय येतो. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद भारत आता सहन करणार नाही, असा संदेशवजा इशारा आपण दिला आहे. 1988पासून पाकिस्तानने ‘ब्लीड इंडिया इन टू थाऊजंड कट्स’ असे धोरणच भारतासंदर्भात स्वीकारले आहे. याअंतर्गत भारताला रक्तबंबाळ करून लचके तोडण्यासाठी पाक लष्कर आणि दहशतवादी संघटना आयएसआय प्रयत्नशील आहे. भारताला सतत त्रास देत राहणे आणि कमकुवत बनवणे यासाठी छुप्या युद्धाचा म्हणजे प्रॉक्सी वॉर म्हणजेच दहशतवादी हल्ल्यांचा मार्ग पाकने अवलंबला आहे. याबाबत भारत सातत्याने मानसशास्रीय संयम बाळगत आला आहे. हा संयम बाळगण्याचे कारण म्हणजे भारताला सातत्याने अशी चिंता होती की आपण जर अशा छोट्या-मोठ्या कुरापतींना प्रत्युत्तर दिले तर त्याचे रूपांतर मोठ्या युद्धात किंवा अणुयुद्धात होऊ शकते. त्यामुळेच गेली तीन दशके भारत संयमाची भूमिका घेत नेहमीच अशा हल्ल्यांनंतर शांत राहिला, पण पाकिस्तान या संयमाचा गैरवापर करून घेत होता. हे लक्षात आल्यानंतर भारताने आपली भूमिका बदलली आहे. विशेषतः 2014मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. भारताने कठोर आणि कणखर भूमिकेतून पाकिस्तान, चीन आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला एक संदेश दिला आहे. ऑगस्ट महिन्यात या भूमिकेत धोरणात्मक बदल केला गेला. भारताने आता आपले लक्ष्य केवळ जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला थोपवण्यापुरते मर्यादित ठेवले नसून पाकव्याप्त काश्मीरवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. वास्तविक हा भूभाग भारताचाच असून जम्मू-काश्मीरचा अविभाज्य घटक आहे, पण पाकिस्तानने फसवणूक करीत तो बेकायदेशीररीत्या बळकावला आहे. पीओके परत कसा मिळवता येईल या स्वरूपाची चर्चा अनेकदा झाली आहे, पण आता त्या दिशेने पावलेही पडू लागली आहेत. राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत अधिकृत वक्तव्ये येऊ लागली आहेत. ऑगस्ट महिन्यात जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेत केंद्र सरकारने कलम 370 व कलम 35 अ रद्दबातल ठरवले आणि जम्मू-काश्मीरचे विभाजन करून तिथे केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. पीओके ताब्यात घेण्याची ही सुरुवात होती. लवकरच हा भाग ताब्यात घ्यायला हवा व सरकार तो नक्कीच घेईल.
Check Also
कामोठ्यात आमदार आपल्या दारी!
उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत व्यक्त केले समाधान पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे वसाहतीत आमदार प्रशांत ठाकूर …