Breaking News

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पूर्वतयारी वेगात -पालकमंत्री उदय सामंत

कार्यक्रमस्थळी चोख आरोग्य व्यवस्था

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
राज्य शासनाच्या वतीने दिला जाणार्‍या महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी नवी मुंबईतील खारघर कॉर्पोरेट पार्क येथे महाराष्ट्राच्या विविध भागातून उपस्थित राहणार्‍या जनसमुदायाच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात यावी. त्यासाठी शासकीय यंत्रणा आणि श्रीसदस्य यांनी परस्परांमध्ये समन्वय साधून कार्यक्रमस्थळी वैद्यकीय सेवेचे सुयोग्य व्यवस्थापन करावे, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (दि. 13) खारघर येथे केल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री सामंत यांच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. ना. सामंत यांनी सलग दुसर्‍या दिवशी कार्यक्रमस्थळी भेट देऊन आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, मुख्यमंत्री कार्यालयाचे तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त तिरूपती काकडे, वास्तुविशारद योगेश वाजेकर, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारीया आदी मान्यवर तसेच श्रीसदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी 14 एप्रिलपासून उपस्थित राहणार्‍या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच आपतकालीन परिस्थितीत आरोग्याविषयी उद्भवणार्‍या अडचणींचा सामना करण्यासाठी आवश्यक सेवा सुविधा, आवश्यक साधन सामग्रीबाबत पालकमंत्र्यांनी मुद्देसूद आढावा घेतला. यासाठी श्रीसदस्य हे शासन आणि प्रशासनाला सहकार्य करतील अशा सूचना दिल्या.
या वेळी वैद्यकीय केंद्र आराखाडा, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिकांची  उपलब्धता, औषध उपलब्धता, आरक्षित रुग्णालये, वैद्यकीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वैद्यकीय विभागामार्फत ग्राफिक्सच्या माध्यमातून तपशिलवार माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या ठिकाणी एकूण 55 वैद्यकीय केंद्र असणार आहेत. खारघरमधील कार्यक्रमाच्या ठिकाणी एकूण सात सेक्टर आहेत. त्यापैकी पाच सेक्टरमध्ये श्रीसदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सेक्टर 1मध्ये चार ते पाच लाख लोकसंख्येसाठी आठ वैद्यकीय केंद्र, सेक्टर 2मध्ये आठ लाख लोकसंख्येसाठी 12 वैद्यकीय केंद्र, सेक्टर 3मध्ये तीन लाख लोकसंख्येसाठी चार वैद्यकीय केंद्र, सेक्टर 6मध्ये तीन लाख लोकसंख्येसाठी तीन वैद्यकीय केंद्र आणि सेक्टर 7मध्ये तीन लाख लोकसंख्येसाठी तीन वैद्यकीय केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्टेजच्या मागे एक वैद्यकीय केंद्र, तर मैदानाच्या शेजारी असलेल्या आमराईत एक वैद्यकीय केंद्र उभारण्यात आले आहे. प्रत्येक वैद्यकीय केंद्रासाठी चार डॉक्टर, दोन नर्स, दोन औषध निर्माता, 10 स्वयंसेवक अशा प्रकारे एकूण 128 डॉक्टर, 64 नर्स, 64 औषध निर्माता, 320 स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  सेक्टर पाच येथे 10 तालुका आरोग्य अधिकार्‍यांना संपर्क अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. 32 वैद्यकीय केंद्रांवर औषधांचे 32 किट ठेवण्यात येणार आहेत. या प्रत्येक किटमध्ये आवश्यक अशा 80 प्रकारच्या औषधांचा साठा करून त्यांचे संच करण्यात आले आहेत.
कार्यक्रमस्थळी एकूण 59 रुग्णवाहिका असणार आहेत. त्यापैकी 32 रुग्णवाहिका साध्या असून त्या 32 वैद्यकीय केंद्रांवर तैनात ठेवण्यात येतील. दोन रुग्णवाहिका पार्किंगच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. 14 रुग्णवाहिका कार्डियाक रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी सात अतिदक्षता वैद्यकीय केंद्राच्या ठिकाणी आणि दोन आमराईच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. पाच कार्डियाक रुग्णवाहिका राखीव ठेवण्यात आले आहेत.
नवी मुंबई आणि पनवेलमधील एमजीएम, रिलायन्स, फोर्टिस, अपोलोसारख्या मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये 100 साध्या आणि 10 आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत तसेच साध्या रुग्णालयांमध्ये 25 टक्के खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. वाढत्या तापमानातील उन्हाळ्याच्या झळांमुळे सोहळ्यासाठी उपस्थित राहणार्‍या जनतेला निर्लजलीकरण (डिहायड्रेशन)चा त्रास होण्याची  शक्यता लक्षात घेऊन मुबलक पाणी आणि ओआरएसची व्यवस्था करण्यात आली आहे.
या आढावा बैठकीतील सूचनांची अंमलबजावणी झाली की नाही याचा पालकमंत्री सामंत हे सकाळी व संध्याकाळी पुरस्कार सोहळ्याच्या तयारीचा स्वत: आढावा घेत आहेत.
मास्क अनिवार्य
वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन येणार्‍या प्रत्येक नागरिकाला मुखपट्टी (मास्क) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. कार्यक्रम भव्य व लक्षात राहण्यासारखा होण्यासाठी सर्वांनी समन्वय साधून कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सामंत यांनी दिले आहेत.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply