Breaking News

शेतकरीराजा पुन्हा हरला भातशेतीचा जुगार!

पोलादपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तयार झालेल्या भातपिकाची कापणी सुरू करतेवेळी भाताचे भारे लवकर सुकण्यासाठी ऑक्टोबर हिट असल्याने रस्त्यालगतच्या गवतावर टाकून उन्ह देण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांकडून सुरू झाला, मात्र तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली अन् शेतकरीराजा पावसावर लावलेला कोकणातील भातशेतीचा जुगार सलग पाचव्या वर्षीदेखील हरला आहे.

पोलादपूर तालुक्यात गेला महिनाभर ऑक्टोबर हिटमुळे उन्हाच्या झळा बसत असल्याने बाजारपेठ रिकामी होऊन रस्तेदेखील निर्मनुष्य होत आहेत, मात्र शेतकरीराजाने यंदा पाऊस व्यवस्थित आणि नक्षत्र धरून बरसल्याने कापणीला सुरुवात करून कापलेले भातपीक शेतातच आडवे घातले होते आणि पावसाने परतीची वाटही जोरदार बरसून धरल्यानंतर शेतकर्‍यांच्या मेहनतीची माती झाली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणामध्ये तालुका कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक व्यग्र होते व प्रशिक्षणानंतर मतदानावेळी सर्वांनाच तालुक्याबाहेरच नव्हे मतदारसंघ सोडून अन्य मतदारसंघात नियुक्तीवर पाठवण्यात आल्याने पोलादपूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा शेवटचा आशेचा किरणही मावळला. विधानसभा मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणी आणि त्यानंतर दिवाळी सणाच्या पाच दिवसांच्या प्रदीर्घ सुट्ट्यांमुळे पंचनाम्यासाठी शेतात ठेवून गुरांसाठी चारा म्हणून उपयोगी ठरू शकेल असे भाताचे भारेदेखील शेताच्या खाचरात कुजविताना शेतकरी हळहळत असल्याचे दृश्य पोलादपूर तालुक्यात सर्वत्र पाहण्यास मिळाले.

पोलादपूर-कापडे, कापडे-कामथे, कोंढवी-गोलदरा, तुर्भे-दिवील, कोतवाल, देवपूर व अन्य भागांत काही शेतकर्‍यांची कापणी होताच मळणी-झोडणीही होऊन अंगणात अन् खळ्यात भात सुकवायची प्रथा आहे, मात्र ज्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे अशा शेतकर्‍यांना शेतमजुरी देऊनही कामगारांची वाट पाहावी लागत होती. त्यांचे भातपीक अद्याप खाचरातच उभे होते. काहींच्या भातपिकाला अजून नीटशी दाण्याने लोंबीही भरली नसल्याने 10-12 दिवसांचा अवधी जाणार असल्याने ते शेतकरी दिवाळीपूर्वी शेतातली लक्ष्मी घरी आणण्याच्या हेतूने अन्य कामांत गुंतले होते, मात्र परतीच्या पावसामुळे आकाशात ढग दाटून आल्यानंतर विजांच्या कर्णकर्कश आवाजात लखलखाट सुरू होऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि गेल्या चार वर्षांप्रमाणे यंदाही अवकाळी पाऊस पडल्यामुळे दरवर्षी केवळ पावसावर लावला जाणारा कोकणातल्या भातशेतीचा जुगार महाड-पोलादपूर तालुक्यातील शेतकरीराजा हरला आहे असे दिसून येते.

पोलादपूर तालुक्यात यावर्षी  4200 हेक्टरवर भातलागवड झाली असून प्रतिहेक्टरी 35 क्विंटल चाळीचे उत्पादन मिळत असताना त्यातून 25 ते 28 क्विंटल तांदूळ मिळतो. तालुक्यात सुमारे 500 ते 600 हेक्टर जमिनीवर वरीचे पीक घेतले जात असून हेक्टरी 7 ते 9 क्विंटल उत्पादन होते. नाचणीचे पीक 1100 ते 1200 हेक्टर जमिनीवर घेतले जात असून प्रतिहेक्टरी 7 ते 8 क्विंटल उत्पादन होते, तर अन्य कडधान्य 100 हेक्टरवर आल्याची खरीप हंगामाची आकडेवारी सांगत आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनी यंदा सोनम, रूपाली, महाबीज कर्जत (6), महागुजरात साल्थी, दप्तरी (1008), महागुजरात श्रीराम प्रीमियर, निर्मल जानकी, महाबीज एचएमटी, अंकूर, महाबीज सुवर्णा, महाबीज श्रीराम, महाबीज कर्जत (3) आणि महागुजरात सौरभ वाणाचे बियाणे पेरले आहे. मतदानाच्या दिवसापासून पावसाची नोंद लक्षणीय असून या पावसामुळे कृषी उत्पादनाची प्रतवारी घटत आहे.

पोलादपूर तालुक्यातील भातशेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठी नुकसानभरपाई म्हणून 74 लाख 80 हजार रुपयांचा निधी अनुदान स्वरूपात प्राप्त झाला होता. धान पिकाच्या नुकसानीबाबत खातेदारांना त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये रक्कम जमा करण्यात येणार असल्याने खातेदारांनी नजीकच्या बँकेत अकाऊंट उघडून संबंधित गावाच्या तलाठ्याला देण्याचे तसेच संयुक्तीक खातेदारांनी एकच खाते उघडून इतर सहहिस्सेदारांनी त्यांची संमती तलाठी अथवा मंडळ अधिकारी यांच्याकडे देण्याचे आवाहनही महसूल खात्यातर्फे करण्यात आले होते. गेल्या वर्षी सरकारी आदेशानुसार प्रतिहेक्टरी दोन हजार रुपयांप्रमाणे दोन हेक्टर मर्यादेपर्यंत चार हजार रुपये व कमीत कमी 500 रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. कागदोपत्री पूर्तता करण्याच्या किचकट पध्दतीमुळे फारच कमी शेतकर्‍यांनी या अनुदानाचा लाभ घेतला. या सर्व नुकसानभरपाईच्या अनुदान प्राप्तीतील कागदोपत्री सुकरता निर्माण केल्यास अधिकाधिक शेतकर्‍यांना लाभ घेणे शक्य होणार असल्याने यंदा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सानुग्रह भरपाई अनुदान देतेवेळी प्रशासनाने कागदोपत्री पूर्ततेच्या अटी शिथिल करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेतकर्‍यांना भातशेती कापणीनंतर ताडपत्रीची गरज

पोलादपूर तालुक्यात वारकरीबहुल सांप्रदायाला कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर वारी करण्याची ओढ लागली असून भातशेती कापणीच्या तसेच झोडणी-मळणीच्या कामाला वेग आला आहे, मात्र रात्री थंडीमुळे धुके आणि दवबिंदूंमुळे भातपिकाच्या भार्‍यांवर ओलावा निर्माण होत असल्याने पंचायत समितीने ताडपत्रीची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. यामुळे शेतकर्‍यांना पावसाळी शेतीचे उत्पादन व्यवस्थित घेताना दिवसभर उन्हात कापलेले भारे ठेवून सुकविल्यानंतर रात्री जोरदार थंडीमुळे धुके आणि दवबिंदूंमुळे दिवसभर पिकलेले भातपीक सकाळी पुन्हा दमट होत असल्याने सायंकाळी या भाताच्या भार्‍यांवर ताडपत्री टाकण्याची गरज शेतकर्‍यांना भासत आहे. दवाने भिजलेले भारे पुन्हा उन्हात वाळवल्यास काळवंडत असून त्याचा भाताच्या लोंब्यांतील तांदळाच्या दर्जावर आणि रंगावरदेखील परिणाम होत असल्याने सरकारने या भातपिकाची सुरक्षा घेण्याकामी शेतकर्‍यांना ताडपत्रीचा पुरवठा तातडीने करावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी पोलादपूर पंचायत समितीकडे केली आहे.

-शैलेश पालकर

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply