आरोग्य प्रहर
हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. चांगली जीवनशैली व आहार उच्च रक्तदाब, रक्तातील कॉलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण, लठ्ठपणा यांसारखे आजार टाळण्यास मदत करू शकतात. वाढते शहरीकरण, आर्थिक प्रगती, कामामुळे व फिरण्यासाठी वाढलेला प्रवास, बाहेरचे खाणे ही सर्व वाढत्या आजारांची कारणे आहेत.
जेवणाची खालावलेली गुणवत्ता, पोषकतत्त्वे नसलेले साखर व मीठ जास्त असलेले पदार्थ नेहमी खाणे, मैद्याच्या पदार्थांचा आहारात समावेश, बाजारातील पॅकेटबंद खाण्याच्या पदार्थांचा वापर आदी गोष्टी जीवनशैलीचा भाग बनले आहे. यामुळे आजारांना निमंत्रण मिळते. हृदयरोग, लठ्ठपणा, मधुमेह हे आजार लक्षणीय प्रमाणात वाढले आहेत.
फळे व भाज्या ः फळे व भाज्यांतून भरपूर व्हिटॅमिन व मिनरल्स मिळतात. यातून भरपूर तंतुमय पदार्थ शरीराला मिळतात. ही पोषकतत्त्वे हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी महत्त्वाची आहेत. रोज फळे व कच्च्या भाज्यांचे एक वाटी सलाड खाल्ले तर खूप फायदा होईल.
धान्ये ः वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांचा आहारात समावेश असावा. धान्यांचे पीठ बनवताना जाडसर दळावे. मैद्यासारखे बारीक पीठ वापरू नये. जेवढा पिठात कोंडा असेल तेवढे चांगले. नेहमी पास्ता खाणार्यांनी मैद्याचा पास्ता न खाता गव्हाचा पास्ता खावा. रोज भात खाणार्यांनी हातसडीचा तांदूळ किंवा ब्राऊन राइस घेणे चांगले.
प्रोटिन ः आहारात प्रोटिनचा योग्य प्रमाणात समावेश करणेही हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. डाळी, कडधान्ये, सुकामेवा, अंडी, मासे आदी योग्य प्रमाणात घ्यावे. मटण किंवा मांसाहारी पदार्थातील लिव्हर, किडनी असे भाग टाळावेत. आहारात सोयाबीनचाही उपयोग करता येईल, तसेच दूध व दुधाचे पदार्थ जसे दही किंवा पनीर तयार करताना साय काढून केल्यास उत्तम.
तेल-तूप ः योग्य प्रमाणातच आहारात तेल-तुपाचा समावेश करावा. एकूण कॅलरीजच्या गरजेपैकी 20 टक्के स्निग्ध पदार्थांतून म्हणजे तेल व तुपातून आल्या पाहिजेत. सामान्य तापमानात फ्रीजमध्ये न ठेवता जे तेल गोठते ते हृदयासाठी चांगले नाही, जसे वनस्पती तूप किंवा बटर. वेगवेगळ्या तेलबियांमधील चांगले गुण आपल्याला मिळण्यासाठी वेगवेगळ्या तेलबियांचे तेल बदलून वापरावे.