Breaking News

सुधागडातील गावे नॉट रिचेबल, बहुसंख्य कंपन्यांचे नेटवर्कच गायब, नागरिक संतप्त आवश्यकतेनुसार मोबाईल टॉवर बसवण्याची मागणी

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात 109 गावे आहेत. हा तालुका अदिवासीबहुल  आहे. बहुसंख्य गावे डोंगर व दर्‍याखोर्‍यात वसली आहेत. यातील सुमारे 40 टक्के गावांना अजूनही मोबाईल व इंटरनेट सेवा मिळालेली नाही. तर काही गावांमध्ये फक्त ठरावीक कंपन्यांचेच मोबाईल व इंटरनेट सेवा चालते, ती ही व्यत्यय देत. कानाकोपर्‍यात आपले नेटवर्क असल्याचे दावे करणार्‍या कंपन्यांची मोबाईल सेवा सुधागड तालुक्यात सपशेल फेल

ठरत आहे.

सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली शहरातही   मोबाईल व इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाला आहे. बुधवारी (दि. 6) एअरटेल कंपनीची सेवा सकाळपासून खंडित झाली होती. तर शुक्रवारी (दि. 1) आयडीया कंपनीचे नेटवर्क पुर्णपणे बंद होते. मागील आठवड्यापासून या कंपनीचे नेटवर्क सारखे ये-जा करत आहे. जियोचे नेटवर्क पालीत अतिशय संथ गतीने चालते, तर  बीएसएनएलचे नेटवर्क बर्‍याच वेळा बंदच असते. व्होडाफोनचा इंटरनेट स्पीड संथ असते. त्यामुळे बँक व सरकारी व्यवहारांवर  प्रतिकुल

परिणाम होतो.

महसुल कार्यालयातील विविध दाखले, सातबारा उतारे, बँकेतील ऑनलाईन व्यवहार तसेच शैक्षणिक माहिती भरणे यासह इतर अनेक व्यवहार करण्यासाठी मोबाईल व इंटरनेट नेटवर्कची आवश्यकता लागते. मात्र नेटवर्क अभावी ही कामे अपुर्ण किंवा वेळेत पुर्ण होत नाहीत. यामुळे नागरिकांना व कर्मचार्‍यांना हकनाक खोळंबावे लागते. कोणी दगावल्यास किंवा आजारी पडल्यास डॉक्टर किंवा नातेवाईकांना साधा फोन करायचा झाल्यास नेटवर्क नसल्यामुळे खूपच त्रास होतो. यामुळे तालुक्यातील नेटवर्क सेवा सुरळीत करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

निवडणूक काळात वायरलेसचा आधार

नेटवर्क समस्येमुळे निवडणूक काळात तालुक्यातील तब्बल 32 गावांमध्ये प्रशासनाने चक्क वायरलेस सेवेचा वापर केला. त्याशिवाय निवडणुकीतील कोणतीच माहिती किंवा आकडेवारी मिळणे शक्य नव्हते. आणि विशेष म्हणजे प्रत्येक केंद्रावर संपर्क साधणे अवघड झाले असते.

तालुक्यात नेटवर्कची समस्या असल्याने सरकारी कामांत खूप व्यत्यय येतो. केवळ नेटवर्कच्या अडचणींमुळे लोकांची विविध कामे विनाकारण खोळंबतात. आपत्ती व्यवस्थापन करतांना किंवा इतर कारणांसाठी लोकांसोबत संपर्क साधणेही शक्य होत नाही. त्यामुळे  नेटवर्क सेवा देणार्‍या कंपन्यांनी ताबडतोब ही समस्या मार्गी लावावी.

-दिलीप रायन्नावार, तहसीलदार,

पाली-सुधागड

पालीसह संपूर्ण तालुक्यात नेटवर्कमध्ये नेहमीच व्यत्यय येत असतो. तालुक्यात डोंगरदर्‍यांचा भाग असल्याने अनेक ठिकाणी मोबाईल व इंटरनेट नेटवर्क नसते. यावर काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

-बाळा कुंभार,

पोलीस निरीक्षक, पाली

शहरापासून अगदी जवळ असलेल्या गावांनादेखील मोबाईल नेटवर्क सेवा मिळत नाही. त्यामुळे संपर्क तुटतो, ऑनलाइन कामे होत नाहीत. यावर योग्य कार्यवाही होणे गरजेचे आहे.

-उमेश यादव, सरपंच, सिद्धेश्वर (बु), ता. सुधागड

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply