माणगांव : प्रतिनिधी
पुणे – दिघी महामार्गाच्या दिघी ते माणगांव या टप्प्याच्या रूंदिकरणाचे काम 70 टक्के पुर्ण झाले असून, माणगांव ते पूणे या टप्प्यातील रस्ता रूंदीकरणाच्या कामाने गती घेतली आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या महामार्गावरील माणगांव – दिघी पोर्ट दरम्यानच्या रस्ता रूंदीकरणाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. ते 70 टक्के पुर्ण झाले आहे. या टप्प्यातील काही छोटे-मोठे पूल बांधणे, साकव, मोर्या बांधणे तसेच पुलावर कठडे उभारणे यासारखी कामे बाकी आहेत. ही कामे मे 2020 पर्यंत पुर्ण होतील, असे सांगण्यात येत आहे.
माणगांव ते पुणे मार्गावरील पुणे, पौंड, ताम्हणी घाट ते रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत 34 कि.मी. अंतराच्या रस्त्याच्या दुसर्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. वन विभागाच्या परवानग्या मिळणे बाकी असल्यामुळे या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू होते. मात्र आता वनखात्याच्या परवानगीची अडचण दूर झाल्यामुळे डिसेंबर 2020 पर्यंत हे काम पुर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. या रूंदीकरणाच्या कामासाठी 134 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. माणगांव – पुणे हे अंतर 120 कि.मी. असून या रूंदीकरणाचे काम पुर्ण झाल्यानंतर तसेच कोंडेथर व ताम्हणी घाटातील अवघड वळणे हटविल्यानंतर तासी 60कि.मी. वेगाने प्रवाशांना अवघ्या दोन तासात पुणे गाठता येणार आहे.
दिघी -पूणे हा राज्यमार्ग होता, मात्र त्याला आता महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवासी, पर्यटक मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यात येतील व येथील पर्यटनाला चालना मिळेल तसेच विविध रोजगारांच्या संधी स्थानिकांना मोठ्या प्रमाणात मिळतील अशी आशा आहे.