चिरनेर ः प्रतिनिधी
कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि तेल व नैसर्गिक वायू कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्यांना काजू कलमे वाटपाचा शुभारंभ व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीमार्फत डॉ. विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी रायगड यांचे हस्ते व नरेंद्र असीजा, ईडी प्लांट मॅनेजर आणि जॉर्ज विल्यम केरकट्टा मॅनेजर एचआर यांच्या उपस्थितीत झाला.
कोकणातील निसर्गसंपन्न साधनसामग्रीचा वापर करून तरुणांनी शेती व्यवसायाकडे वळावे आणि गाव सोडून न जाता आपल्या गावातच व्यवसाय सुरू करावा या उद्देशाने शासन आणि उद्योगक यांच्यामार्फत विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर काजू कलमे वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
उद्योजकांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीचा उपयोग शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि तदनुषंगिक बाबीसाठी केला जातो, परंतु शेतकर्यांच्या उन्नतीसाठी जर उद्योजकांनी सीएसआर फंडाचा उपयोग केला आणि फळबाग लागवड केली, तर शेतकर्यांच्या चेहर्यावरचा आनंद चिरंतन राहणार आहे, असे सूचित केले. यापुढे शेती हा एकमेव व्यवसाय स्थिर राहणार असून त्यालाच महत्त्व येणार आहे. शेतीमध्ये पिकणारे अन्नधान्य कोणत्याही कारखान्यात उत्पादित होत नसून ते शेतकर्यांच्या घामाच्या थेंबातून निर्माण होते. त्यामुळे शेती हा जगात महत्त्वाचा व्यवसाय राहणार आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा परिषद केंद्र शाळा चिरनेर या गावातील विद्यार्थ्यांना तेल व नैसर्गिक वायू कॉर्पोरेशन मार्फत इको फ्रेंडली चप्पल वाटप जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास चिरनेर गावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, तालुका कृषी अधिकारी वजय साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी ऋतुजा नारनवर, कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
– जिल्ह्यातील तरुण शेतकर्यांनी कृषी योजनांचा लाभ घेऊन आपले गाव न सोडता गावातच राहून उन्नती करावी.
-डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी – चिरनेर गावातील शेतकर्यांनी शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेतला असून शेतकरी महिला गट, सेंद्रिय शेती गट, शेती शाळा इत्यादी कार्यक्रम उत्साहाने राबविले आहेत. तसेच गावातील महिलांचा शेतीत जास्तीत जास्त सहभाग असल्याने जिल्हाधिकारी महोदयांनी गावातील शेतकर्यांचे कौतुक केले.