पेन्शनर्सला दिलासा
मुंबई ः प्रतिनिधी : 20 लाखांपर्यंत मिळणार्या ग्रॅज्युटीवर आता कोणताही कर आकारला जाणार नसल्याची घोषणा करण्यात आली असून या निर्णयामुळे 2018-19मध्ये निवृत्त होणार्या नोकरदारवर्गाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाची माहिती दिली असून ग्रॅज्युटी कायद्यांतर्गत न येणार्या नोकरदारांना हा निर्णय लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरसंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न आता करमुक्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे स्टँडर्ड डिडक्शनमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. यावर्षी निवृत्त होणार्या कर्मचार्यांनाही दिलासा देण्यात आला आहे. आतापर्यंत 10 लाखांपर्यंत मिळणारी ग्रॅज्युटी करमुक्त होती. हीच मर्यादा आता 20 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भात 2018मध्येच सूचना काढण्यात आली होती. तसेच जूनमध्ये सादर होणार्या नव्या सरकारच्या अर्थसंकल्पातही अजून काही महत्त्वपूर्ण बदल होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. सरकारने 20 लाखांपर्यंतची ग्रॅज्युटी करमुक्त असल्याचे जाहीर केले असले तरी या निर्णयाची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून करण्यात येईल हे मात्र सांगण्यात आले नाही.