Breaking News

पाण्यामुळे ताकई-आडोशी मार्ग निसरडा

ग्रामस्थांचा टँकरचालकांना निर्वाणीचा इशारा

खालापूर : प्रतिनिधी

ढेकू औद्योगिक वसाहतीमध्ये टँकरने पाणीपुरवठा करणार्‍या टँकरमधील पाणीगळती होऊन ताकई फाटा ते अत्करगाव आडोशी मार्गावर पाण्याने रस्ता निसरडा होऊन मोटरसायकलस्वारांना व पायी जाणार्‍या महिला पादचार्‍यांना अपघात होऊन जायबंदी झाले आहेत. या मार्गावरून पाणीपुरवठा करणार्‍या टँकरचे झाकण पूर्णपणे बंद करावे तसेच मार्गावर पाणी सांडणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा या मार्गावरून पाणीपुरवठा करणारे टँकर चालू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा ताकई ग्रामस्थ संदेश पाटील, जया पाटील, राकेश पाटील, रमाकांत पाटील आदींनी दिला आहे. कारखान्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरचालक दामदुपटीने पैसे वसूल करून रग्गड कमाई करीत आहेत, मात्र  पाणी भरलेला टँकर घेऊन जाताना त्याचे झाकण पूर्णपणे बंद करण्यात येत नाही. त्यामुळे त्यातील पाणी सांडून ताकई-आडोशी मार्ग निसरडा होत आहे. त्यावरून जाताना दुचाकी घसरून दररोज अपघात घडत असून, दुचाकीस्वारांना दुखापत होणे ही नित्याची बाब होऊन बसली आहे. ताकई गावातील तरुणांनी नुकतीच परिसरातील टँकरचालक व वाहकांची एक बैठक घेतली. या बैठकीला बालाजी वॉटर सप्लाय, समाधान वॉटर सप्लाय, राधे पाणीपुरवठा, श्रवण पाणीपुरवठा टँकर, तसेच तकळगाव, चिंचवली, सावरोली, ताकई येथील 15 पाणीपुरवठा टँकरचालक व मालक उपस्थित होते. यापुढे टँकरचालकांनी दक्षता घेत पाणी रस्त्यावर सांडणार नाही याची खबरदारी घ्यावी, अन्यथा टँकरचालकांना धडा शिकवला जाईल, असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply