अमरावती ः वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी नदीत रविवारी (दि. 15) दुपारी बोट उलटून 12 जणांचा मृत्यू झाला. बोट बुडाल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, 23 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला होता. अशातच 61 जणांना घेऊन निघालेली आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळाची बोट पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कच्चुलुरू येथे बुडाली. या बोटीत प्रवास करीत असणारे अनेक जण बेपत्ता असून, त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. जोरदार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते.
दरम्यान, या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मंत्री व नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे, तर घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी केली आहे.
पोलीस अधीक्षक अदनान अस्मी यांनी सांगितले की, या बोटीत 61 जण होते, ज्यामध्ये 11 चालक सदस्यांचाही समावेश होता. ही बोट कच्चुलुरूजवळ उलटली.
गोदावरी नदीत बोट बुडाल्याची घटना वेदनादायी आहे. या दृर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात
मी सहभागी आहे. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान.