आज संपूर्ण जग पर्यटनाच्या जोरावर विदेशी मुद्रा कमावत आहे. येणार्या पर्यटकांपासून स्थानिकांना रोजगार त्याचप्रमाणे परदेशी चलन मिळाल्यामुळे त्या देशाची पत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधारत असते. दिवसेंदिवस पर्यटनाला अधिक चांगले दिवस येत असून आज सर्वच देश पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातबाजी करीत आहेत. त्यांना आपल्या देशात बोलावत आहेत. पर्यटक या घटकामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत असते. आपल्या देशातील असणारी पर्यटन स्थळे व त्यावर केलेली उपाययोजना आणि विकास पर्यटकांना पाहावयास मिळतो.
पर्यटन हा जगातील सर्वच देशांनी अंगीकृत केलेला गुण असून त्यावर खर्च करून पर्यटन स्थळे विकसित करण्यावर आज सर्वच देश लक्ष देत आहेत. भारतातसुद्धा ज्याप्रमाणे राजस्थानला पर्यटकांची गर्दी असते त्याचप्रमाणे कोकण हा भागसुद्धा पर्यटकांनी बहरला आहे. त्यापैकीच मुंबईपासून अगदी 165 किलोमीटर अंतरावर असलेला मुरूड तालुका आहे.
मुरूड तालुका हा नवाबकालीन तालुका आहे. श्रीवर्धन, म्हसळा व मुरूड हे तीन तालुके जंजिरा नवाबाच्या अधिपत्याखाली असणारे तालुके होते. नवाबांचे वास्तव्य मुरूड येथील राजवाड्यात असल्याने मुरूड तालुक्याला त्या काळात मोठ्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या होत्या. सन 1888 साली मुरूड
नगरपरिषदेची रचना त्या काळात झाल्याने मुरूड शहरवासीयांना याचा मोठा फायदा झाला आहे.गारंबी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी पाहिले धरण नवाब सरकारने बांधून दिले होते. त्याचप्रमाणे शहराची रचना सुंदर पद्धतीने आखण्यात आली आहे. मुरूड तालुक्यात नवाब काळापासून काही पर्यटकांना आकर्षित करणारी स्थळे आहेत. फक्त या स्थळांच्या विकासासाठी निधी मिळाल्यास येथे भविष्यात पर्यटकांचा मोठा लोंढा येऊन स्वयंरोजगाराला चालना मिळू शकणार आहे. यापैकी गारंबी धरण पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. या धरणातून फार पूर्वीपासून मुरूड शहराला पाणीपुरवठा होत आहे व हे ठिकाण एकेकाळी नवाबसाहेबांच्या शिकारीसाठी प्रसिद्ध होते. शिघरे ग्रामपंचायतीच्या हद्दीपासून थोडे पुढे गेल्यास घनदाट जंगलात हे प्रेक्षणीय स्थळ आहे. येथे काळ्या दगडातून सतत पाणी वाहत असते.निरव शांतता व आजूबाजूला मोठमोठे महाकाय वृक्ष यामुळे सूर्यकिरणे येथे पोहचत नाहीत. पावसाळ्यात असंख्य पर्यटक येथे पोहण्यास येतात. खूप मजा करताना दिसतात. अतिशय प्रेक्षणीय व वाहत्या पाण्याचे झरे हे मेअखेरपर्यंत असतात. या ठिकाणी पर्यटकसंख्या अधिक वाढवण्यासाठी शासनाचा निधी प्राप्त झाल्यास बुशी धरणाप्रमाणे रचना केल्यास बाराही महिने येथे पर्यटक खेळते राहू शकतात. याच स्थळाप्रमाणे सवतकडा हेसुद्धा प्रेक्षणीय स्थळ असून येथे 400 फुटांवरून सतत पाणी खाली पडत असते. हे ठिकाण वावडूनगी ग्रामपंचायत हद्दीत असून येथे जाण्याचा रस्ता नसल्याने येथे पर्यटकांना पोहचता येत नाही. जंगल भागातून किमान तीन किलोमीटर चालावे लागते. तेव्हा या ठिकाणी पोहचता येते. कोणतेही वाहन या ठिकाणी जात नसल्याने पर्यटकांना हे ठिकाण पाहता येत नाही. स्थानिक नागरिक येथे जातात व उंच पडणार्या धबधब्याखाली आनंद लुटताना दिसतात. याबाबत वावडूनगी ग्रामपंचायत सरपंच हरीचंद्र भेकरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आमच्या
ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती गरीब असल्याने आम्हाला विकासकामांना निधी उपलब्ध होत नाही. तरीसुद्धा आम्ही आमदार-खासदारांच्या संपर्कात असून विकास निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
मुरूड शहर नगरपरिषद हद्दीत समुद्रकिनारी दगडी बंधारा आवश्यक असून गेल्या दोन वर्षांपासून मुरूड नगरपरिषद प्रयत्न करूनसुद्धा यश न मिळाल्याने हा दगडी बंधारा होऊ शकला नाही. त्यामुळे समुद्रकिनारी बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. यासाठी येथे दगडी बंधारा अलिबाग समुद्र किनार्याप्रमाणे झाल्यास पर्यटकवृद्धी होणार आहे. मुरूड नगरपरिषदेचा शासनाकडे पाठपुरावा सुरू असून त्यांना नक्कीच यश प्राप्त होणार आहे. हा बंधारा झाल्यास मुरूड समुद्र किनार्याला शोभा वाढून पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.
त्याचप्रमाणे दत्तमंदिर, जंजिरा किल्ला व फणसाड अभयारण्य अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे भविष्यात पर्यटक प्रचंड संख्येने येथे येणार आहेत. मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यसुद्धा वन्यजीवांसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी परदेशी पर्यटकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे, परंतु या ठिकाणी पर्यटकांना फिरण्यासाठी गाडी नसल्याने सर्व भाग फिरता येत नाही. 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात फणसाड अभयारण्य क्षेत्र पसरले असून येथे कोणतेही वाहन नेता येत नसल्याने पर्यटक नाराज होतात. याबाबत फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे बॅटरीवर चालणार्या गाड्यांची मागणी केली आहे. आमचा प्रस्ताव मंजूर होताच पर्यटकांना ही सुविधा मिळणार आहे. बॅटरीवर चालणार्या गाड्यांचा कोणताही आवाज होत नाही. त्यामुळे वन्यजीवांना कोणताही धोका पोहचणार नाही. त्याचप्रमाणे मुरूड तालुक्यातील खारआंबोली या ठिकाणी सुमारे 30 कोटी रुपये खर्च करून आंबोली धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी आढळून येते. एक नावाजलेले ठिकाण म्हणून येथे पर्यटक पावसाळ्यात मोठ्या संख्येने येतात. या धरणात बोटिंग व्यवस्था त्याचप्रमाणे धरण भरल्यावर जे पाणी खाली पडते ते पाणी अडवून त्याचा प्रवाह आकर्षकपणे केल्यास येथेसुद्धा पावसाळ्यात दुप्पट पर्यटकांची गर्दी होऊ शकणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभल्यास येथे आणखीन पूरक योजना राबवण्यास मदत होणार आहे.
सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर अलिबाग येथील मांडवा बंदराप्रमाणे तरंगत्या जेट्टीसाठी प्रतीक्षा आहे. जंजिरा किल्ल्यावर पर्यटक बोटींमधून उतरताना खूप यातना सहन कराव्या लागतात. कारण भरती असल्यामुळे शिडाची बोट या ठिकाणी हेलकावे घेत असते.त्यामुळे असंख्य पर्यटकांना उंचावरून उडी मारताना पायाला मोठी इजा होते. या किल्ल्यावर तरंगती जेट्टी अस्तित्वात आली तर किल्ल्यावर अगदी सहज जाता-येता येणार आहे. जंजिरा किल्ल्याप्रमाणेच पदमदुर्ग किल्ला संभाजीराजांनी बांधला असून या ठिकाणीसुद्धा तरंगती जेट्टी आवश्यक आहे. पुरातत्त्व खात्याकडून ना हरकत दाखला न मिळाल्यामुळे या दोन्ही जेट्टींचे काम रखडले आहे. मुरूड तालुक्यातील विविध विकासकामे मार्गी लागावीत यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. सर्व सोयीसुविधा पुरवण्यासाठी आमदार- खासदारांचे सहकार्य लाभल्यास या ठिकाणी मोठा विकास निधी प्राप्त होऊन जनतेच्या व पर्यटकांच्या सोयीची अनेक कामे मार्गी लागणार आहेत.
-संजय करडे, खबरबात