न्यायालयाचा निकाल
पोलादपूर, अलिबाग : प्रतिनिधी
राजकीय वैमनस्यातून पोलादपूर तालुक्यातील माटवण येथील गणपत विश्राम मांढरे यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी माणगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश टी. एन. जहांगीरदार यांनी नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावाली आहे.
विठ्ठल कृष्णा म्हस्के, सखाराम विश्राम मांढरे, विकास विठ्ठल म्हस्के, संकेत नारायण म्हस्के, विलास पांडुरंग गोगावले, नाना नथू मांढरे, नाना धोंडू म्हस्के, राजू श्रीपत कालगुडे, कैलास धोंडू नवघरे अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे काम करणार्या या नऊ जणांनी शिवसेनेचे गणपत विश्राम मांढरे यांची 31 मे 2020 रोजी हत्या केली होती.
घटनेच्या दिवशी गणपत मांढरे हे त्यांच्या मोटरसायकलवरून (एमएच 06-बीबी 5344) माटवण येथून कामावर जात असताना विलास गोगावले यांच्या गुरांच्या गोठ्याजवळ आले असता आरोपींनी त्यांना अडवून लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. त्यात गणपत मांढरे यांचा मृत्यू झाला.
याबाबत गणपत मांढरे यांचा मुलगा अतुल मांढरे याने पोलादपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सहाय्यक निरीक्षक प्रशांत जाधव व रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी तपास करून माणगाव अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायाधीश टी. एन. जहांगीरदार यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. जहांगीरदार यांनी नऊ आरोपींना दोषी ठरवून त्यांना जन्मठेप, प्रत्येकी 50 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली.
या खटल्यात शासकीय अभियोक्ता म्हणून अॅड. जितेंद्र म्हात्रे, तर मदतनीस म्हणून अॅड. मोहिनी शेठ यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी यु. एल. धुमास्कर, पोलीस हवालदार शशिकांत कासार, छाया कोपणार व शशिकांत गोविलकर यांनी सहकार्य केले.