पनवेल ः बातमीदार
चिखले येथून अटक करण्यात आलेला बांगलादेशी तेथील घरजावई असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. चिखले येथे घरजावई होण्यापूर्वी तो काही वर्षांपूर्वी तालुक्यातील बेलवली येथे राहत होता. त्यानंतर त्याने चिखले येथील एका मुलीसोबत लग्न करून तो घरजावई
बनला होता. खोट्या नावाने वास्तव्य करणार्या ईनामूल यांच्याकडे पोलिसांना बोगस नावाने रेशनकार्ड, लायसन्स, आधार कार्ड, स्थानिक वास्तव्याचा दाखला, वय, अधिवास याचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान ओळखपत्र ही सर्व कागदपत्रे सापडून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकारामुळे एवढी सगळी शासकीय कार्डे व कागदपत्रे बांगलादेशी नागरिकांकडे कशी आली? असा सवाल
उपस्थित होत आहे.
मात्र या सापडलेल्या कागदपत्रांमुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे. ईनामूल उमर मुल्ला हा तालुक्यात सुरुवातीला टेम्पो चालवून आपला उदरनिर्वाह करत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यानंतर चिखले येथील मुलीसोबत 2011 मध्ये लग्न केल्यानंतर तो तेथेच त्यांच्या घरी मनोहर राहू पवार या नावाने घरजावई म्हणून राहू लागला. सासर्याचे दुकान तो स्वतः चालवु लागला. त्याने ईको कार देखील विकत घेतली असल्याचे समोर आले आहे. ईनामूल हा चिखले येथे आपली ओळख लपवून राहत असल्याने त्याचा कोणालाही संशय आला नाही.
चिखले गावात मनोहर राहू पवार (ईनामूल उमर मुल्ला) हा बांगलादेशी नागरिक आहे हे कोणालाही माहीत नव्हते. त्यामुळे आपली बांगलादेशी असल्याची ओळख लपवण्यात तो काही वर्षे यशस्वी झाला होता. मात्र बांगलादेशला लपुन जातेवेळी त्याचे बिंग फुटले. या वेळी त्याची चौकशी करण्यात आली व त्याला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्याची खरी माहिती समोर आली. मनोहर पवार हा बांगलादेशी असल्याचे समजताच सार्यांना धक्काच बसला. इनामुलचा (मनोहर पवार) बनावट कागदपत्रे बनवून घेऊन त्याद्वारे त्याचा उद्देश काय होता हे मात्र समजू शकलेले नाही.