नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भारतीय जनता पक्षानेही त्यादृष्टीने आपले लक्ष दिल्लीवर केंद्रित केले. त्यानुसार गुरुवारी (दि. 26) पूर्व दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा केजरीवाल सरकार आणि काँग्रेसवर यथेच्छ बरसले. अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर आंदोलन भडकावणे आणि नकारात्मक राजकारण करण्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तुकडे तुकडे गँग दिल्लीच्या अशांततेला जबाबदार आहे. दिल्लीच्या जनतेने त्यांना शिक्षा करायला हवी, असा हल्लाबोल अमित शहा यांनी या वेळी केला.
दिल्लीच्या जनतेच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली योजनाबद्ध रीतीने काम सुरू आहे. दिल्ली सरकारवर समाजकंटकांना मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला. शहा म्हणाले की, शीख दंगलीनंतर इतक्या वर्षांनी काँग्रेस सरकारमध्ये पीडितांना कधीही न्याय मिळाला नाही. मोदी सरकारने सत्तेवर येताच एसआयटी गठीत केली. आज दंगल घडवणारे तुरुंगात आहेत. पूर्ण देश या हत्याकांडाला विसरू शकत नाही. हजारो शीख बंधूंना ठार करण्यात आले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरदेखील अमित शहांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल नवीन नवीन गोष्टी करतात. त्यांनी तर एक नवीनच टूम काढली आहे. विचारच कशाला करायचा? बजेट का द्यायचा? भूमिपूजन, उद्घाटन का करायचं? कोणाचं आयतं केलेलं काम असेल तर आपला शिक्का त्यावर मारायचा, अशी टीकाही शहा यांनी केली.
सुधारित नागरिकत्व कायद्यावर विरोधी पक्षांनी दिल्लीच्या जनतेची दिशाभूल करून दिल्लीची शांतता भंग केली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तुकडे तुकडे गँग दिल्लीच्या अशांततेला जबाबदार आहे. दिल्लीच्या जनतेनेच त्यांना शिक्षा करायला हवी, असेही शहा म्हणाले.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …