रोहे : प्रतिनिधी
वाचन संस्कृती वाढवण्यासाठी येथील भाटे सार्वजनिक वाचनालयातर्फे काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीला रोह्यातील नागरिक व साहित्यप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध भागात या ग्रंथदिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. भाटे सार्वजनिक वाचनालयातर्फे प्रथमच काढण्यात आलेल्या या दिंडीत पारंपरिक वेशभुषेत नागरिक सहभागी झाले होते. ढोलताशा पथक, लेझिम पथक तसेच ठिकठिकाणी काढलेल्या सुबक रांगोळ्या यामुळे वातावरणात नवचैतन्य पसरले होते. तसेच वाचन संस्कृती वाढण्यासाठी प्रबोधनात्मक फलक लावण्यात आले होते. रोहे शहरातील दत्त मंदिर, ब्राह्मण मंडळ, अभंग सेवा मंडळ, सर्वेश अपार्टमेंट, दुर्गादेवी मंदिर, किराणा व्यापारी मंडळ, आडवी बाजारपेठ, गुजराथी समाज, शिंपी समाज, सोनार समाज, लँडमार्क सोसायटी रहिवासी, धारप कुटुंबिय यांच्यातर्फे या ग्रंथदिंडीचे स्वागत करण्यात आले. भाटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष किशोर तावडे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष वसंत भट, सहकार्यवाह महेश कुलकर्णी, संचालिका सायली कुळकर्णी, संचालक राजेश देशमुख, वंदना जोशी, विद्या घोडींदे,जयवंत घरत आदिंनी ही ग्रंथदिंड यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.