वक्तव्यावरून काँग्रेसने खडसावले
बीड ः प्रतिनिधी
देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असे विधान राज्याचे गृहनिर्माणमंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. यावरून काँग्रेस नेत्यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली असून, काँग्रेस नेत्यांचा अपमान सहन करणार नाही, असे आव्हाडांना खडसावले आहे.
बीडमध्ये बुधवारी (दि. 29) संविधान बचाव महासभा झाली. या वेळी बोलताना आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली. या सभेला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, तिस्ता सेटलवाड, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना अबू तालिब रहेमानी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (जेएनयू) विद्यार्थिनी दीपशिखा धर आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात आव्हाड म्हणाले की, इंदिरा गांधींनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अहमदाबादेतून पहिला उठाव झाला आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीतूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर आव्हाड यांनी खुलासा करणारे ट्विट केले आहे. आव्हाड यांनी ट्विट व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले की, इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते, पण आणीबाणीबद्दल मतमतांतरे असू शकतात. एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही.