उरण : बातमीदार
आम्ही पिरकोनकर समूह आयोजित पाचव्या दिवाळी गडकिल्ले स्पर्धेचे बक्षिस वितरण रविवारी (दि. 30) झाले. उरण तालुक्यातील पिरकोन येथील पंचरत्न इंग्लिश मेडीयम स्कूलच्या सभागृहात रंगलेल्या या दिमाखदार कार्यक्रमात सर्व स्पर्धक किल्लेदारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. पारितोषकांसाठी अशोक मंगल गावंड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र ठाकूर यांनी केले. माजी जि.प.सदस्य जीवन गावंड, जेएनपीटी विद्यालयाचे प्राचार्य गिरीश पाटील, सायली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी व्यासपीठावर जगदिश गावंड, अजय शिवकर, मनिश पाटील, नागेंद्र म्हात्रे, शेखर म्हात्रे, चंद्रशेखर भोमकर आदी उपस्थित होते. गडकिल्ल्यांच्या या उरण तालुकास्तरीय स्पर्धेत जवळपास पाऊणशे प्रतिकृती नोंदवल्या गेल्या. कांबळीवाडी ग्रुप (बोरी) येथील शिवनेरी किल्ल्यास प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले. निसर्ग म्हात्रे (वशेणी) यास द्वितीय तर युईएस कॉलेज, उरण व गोंधळीपाडा ग्रुप, पिरकोन यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. दहा किल्ल्यांना उत्तेजनार्थ पारितोषक तर उर्वरीत स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. चेतन गावंड (अध्यक्ष), तुषार म्हात्रे(सचिव), सुरेंद्र गावंड, प्रमोद पाटील यांनी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहीले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार म्हात्रे यांनी केले तर प्रमोद पाटील यांनी समारोप केला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मनोहर म्हात्रे, भूषण गावंड, हेमंत गावंड यांनी मेहनत घेतली.