Breaking News

पंतने संधी गमावली, कार्तिकला खेळवण्याची मागणी

मोहाली : वृत्तसंस्था

अ‍ॅश्टन टर्नरची फटकेबाजी त्याचबरोबर पीटर हँड्सकॉम्ब आणि उस्मान ख्वाजा यांनी तिसर्‍या विकेटसाठी 192 धावांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथा वन डे सामना जिंकला. या सामन्यात यष्टिरक्षक रिषभ पंतचे गचाळ क्षेत्ररक्षण टीकेचे धनी ठरले. पंतने या सामन्यात सोप्या संधी गमावल्या. त्याच्या ढिसाळ कामगिरीमुळे दिनेश कार्तिकच्या समावेशाची मागणी जोर धरू लागली आहे.

टीम इंडियाचा अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन वन डे सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. त्याची उणीव चौथ्या सामन्यात प्रकर्षाने जाणवली. आगामी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून पंतचे नाव आघाडीवर आहे. त्याला वर्ल्ड कपपूर्वी संधी मिळावी म्हणून धोनीला विश्रांती देण्यात आली, पण धोनीच्या अनुपस्थितीत पंतने चमकण्याची संधी गमावली.

फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर पंतने एक झेल सोडला; तर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर दोन यष्टिचीतच्या संधी गमावल्या. त्याने सामन्यात धोनीची कॉपी करण्याचाही प्रयत्न केला. त्याला ही कॉपी महागात पडली.

चोप्रा म्हणतो, वेळ द्यायला हवा!

पंतची तुलना धोनीशी करणार्‍यांना आकाश चोप्राने ट्विटवरून सुनावले आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी पंतला त्याची क्षमता सिद्ध करण्यासाठी योग्य ती संधी द्यायला हवी. त्याची तुलना धोनीशी करणे योग्य नाही. पंतमधील कौशल्य पाहता नक्कीच त्याला वेळ द्यायला हवा, असे मतही चोप्राने व्यक्त केले आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेमध्ये धोनीला पर्याय म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. असे असले तरी केवळ क्षेत्ररक्षणाच्या आधारावर पंतकडे पाहणे चुकीचे ठरेल, असेदेखील चोप्रा म्हणाला.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीगचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तटीआयपीएल रोटरी क्रिकेट प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह …

Leave a Reply