नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 गडी राखून विजय मिळवला. पीटर हँड्सकॉम्बचे शतक (117), ख्वाजाची संयमी खेळी (91) आणि टर्नरची तुफानी 84 धावांची खेळी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 359 धावांचे आव्हान 2 षटके राखून पार केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. त्याचबरोबर विजयासह ऑस्ट्रेलियाने एक विक्रम रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने मिळवलेला हा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला.
शिखर धवनच्या 143 धावा आणि रोहित शर्माच्या 93 धावांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करीत 50 षटकांत 9 बाद 358 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गेल्या सामन्यात झंझावाती खेळी करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच या सामन्यात शून्यावर बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला त्रिफळाचीत केले. फिंच केवळ दोन चेंडू खेळला. अत्यंत हुशारीने गोलंदाजी करून अनुभवी डावखुरा फलंदाज शॉन मार्श याचा बुमराहने त्रिफळा उडवला आणि ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला. मार्शने केवळ 6 धावा केल्या.
सुरुवातीलाच दोन धक्के बसल्यामुळे ऑस्ट्रेलियाने संथ सुरुवात केली. 359 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 12व्या षटकात पाहुण्या संघाचे अर्धशतक पूर्ण झाले. शतकवीर पीटर हँड्सकॉम्ब झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का बसला. त्याने 105 चेंडूंत 117 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 3 षटकार समाविष्ट होते.
यानंतर टर्नरने झंझावाती खेळी केली. त्याने 43 चेंडूंत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 84 धावा केल्या. त्याला सामनावीर जाहीर करण्यात आले.