Breaking News

माथेरानचा निसर्ग उतरला कॅनव्हासवर

कर्जत : बातमीदार

नवोदित कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणे, तसेच माथेरानची ख्याती आणि पर्यटन वाढावे, या उदात्त हेतूने प्रसाद सावंत मित्र परिवाराने माथेरान येथे ’निसर्ग चित्रण स्पर्धा’ आयोजित केली होती. त्यात महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक राज्यातील अनेक कलाविद्यापीठातून सुमारे 120 चित्रकार सहभागी झाले होते.  या चित्रकारांनी माथेरानमध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन सुंदर निसर्गचित्रे साकारली. माथेरानचा निसर्ग आणि येथील वैशिष्ट्ये कॅनव्हासवर सुबकरित्या उतरवली. या स्पर्धेच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध चित्रकार गणेश हिरे यांनी माथेरानचे वैशिष्ट्य असलेल्या घोडे आणि घोडेस्वारी हे  प्रत्यक्ष निसर्गचित्र काढले. तसेच अमित ढाणे यांनी प्रसाद सावंत यांचे व्यक्तिचित्र रेखाटले. नुकतीच माथेरानच्या निसर्गात निसर्गचित्र स्पर्धा घेण्यात आली. माथेरानच्या श्रीराम मंदिर चौकात या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक मुंबई येथील सुज्योत पारखे यांनी पटकावला, तर द्वितीय क्रमांक कोल्हापूरच्या हर्षवर्धन देवताळे यांना, तर तृतीय क्रमांक मुंबई येथील ओमकार जंगम यांना मिळाला. या वेळी दोन उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात आली. वनक्षेत्रपाल नारायण राठोड, विजय कदम, नितीन शेळके, श्रेयस गायकवाड तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला मेडलने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांनी या नेटक्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेचे व्यवस्थापन पेण येथील चित्रकार जितेंद्र गायकवाड यांनी केले. तसेच लक्ष्मण कदम, अनिल गायकवाड, आतिष सावंत आदींनी स्पर्धेच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply