Breaking News

भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, आघाडीसोबत जाणार्या शिवसेनेला शुभेच्छा! -चंद्रकांत पाटील

मुंबई : प्रतिनिधी

सत्तास्थापनेसंदर्भात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आम्ही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, अशी माहिती राज्यपालांना दिल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर शिवसेनेला काँग्रेस आघाडीसोबत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या शुभेच्छा आहेत, असेही पाटील म्हणाले.

निकाल लागून दोन आठवडे उलटल्यानंतरही सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला नव्हता. अखेर शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर रविवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या दोन बैठका झाल्या. सायंकाळी झालेल्या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकार स्थापन करणार नसल्याची माहिती दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला जनादेश दिला होता. सोबत काम करण्यासाठी हा कौल होता, मात्र शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली आहे. आम्हाला जनादेशाचा अपमान करायचा नव्हता. त्यामुळे आम्ही राज्यपालांची भेट घेऊन भाजप सरकार स्थापन करणार नसल्याचे सांगितले आहे.

शिवसेनेसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले की, शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीसोबत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या शिवसेनेला शुभेच्छा आहेत. या वेळी पाटील यांच्यासोबत गिरीश महाजन, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आदी नेते उपस्थित होते.

शिवसेनेची सोबत अनर्थ ठरेल : संजय निरूपम

मुंबई : काँग्रेस-शिवसेनेमधील संभाव्य मैत्रीला मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. शिवसेनेसोबत जाणे हा काँग्रेस पक्षासाठी अनर्थ ठरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या 15 दिवसांपासून राज्यात निर्माण झालेली सत्ताकोंडी फोडण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निर्णायक प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला शनिवारी संध्याकाळी सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले. त्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षानेही समांतर समीकरणाची जुळवणी सुरू केली आहे. जयपूर येथे रविवारी (दि. 10) झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अनुकूलता दर्शवण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे, मात्र काँग्रेसचे माजी खासदार संजय निरूपम यांनी अशा प्रकारे सत्तास्थापनेस आपला

विरोध दर्शविला आहे.

’सध्याच्या राजकीय परिस्थितीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सरकार स्थापने कठीण आहे. कारण आमच्याकडे तेवढे आकडे नाहीत. बहुमताचा आकडा गाठायचा असेल, तर आम्हाला शिवसेनेची गरज लागेल, मात्र शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा विचार कोणत्याही परिस्थितीत केला जाऊ नये. तसा काही निर्णय झाल्यास तो पक्षासाठी अनर्थकारी ठरेल,’ असे संजय निरूपम यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांचेही असेच मत असल्याचा दावा निरूपम यांनी केला आहे.

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला राज्यपालांकडून निमंत्रण

मुंबई : राज्यातील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे सांगितल्यानंतर राज्यपालांनी दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. सोमवारी (दि. 11) सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याची मुदत देण्यात

आली आहे.

दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेकडून प्रस्ताव आलेला नाही. अधिकृत प्रस्ताव आल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही, असे म्हणत गुगली टाकली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply