आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप गुरव यांचा विशेष गौरव
नागोठणे : प्रतिनिधी : येथील ज्ञानेश्वर मंदिरात शनिवार (दि. 9) पासून चालू झालेल्या अखंड नामयज्ञ सोहळ्यात नागोठणेतील शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप गुरव तसेच त्यांचे आईवडील, प्रल्हाद गुरव आणि रेखा गुरव यांचा संत सेवा मंडळाच्या वतीने कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. चार दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात दिवसभर ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पठण, सायंकाळी पाच ते सहा प्रवचन, सहा ते साडेसात हरिपाठ, रात्री साडेनऊ ते साडेअकरा कीर्तन आदी कार्यक्रम घेण्यात आले. मंगळवारी (दि. 12) सकाळी ह.भ.प. गजानन महाराज बलकावडे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर पालखी सोहळा व महाप्रसादानंतर या सोहळ्याची सांगता होणार आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रतन हेंडे, ऋषिकेश भोय यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी मंडळींनी विशेष परिश्रम घेतले.