कर्जत : बातमीदार
तालुक्यातील नेवाळी-मोहिली भागात असलेल्या सोनगिरी किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन तरुण बुधवारी (दि. 19) सकाळी कर्जत शहरातील शिवाजी महाराज स्मारक येथे पोहचले. ही शिवदौड कर्जत येथील शिवराज प्रतिष्ठानने आयोजित केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील सोनगिरी हा एक किल्ला होता. कर्जत तालुक्यातील नेवाळी-मोहिली गावाच्या मागे उभ्या असलेल्या सोनगिरी किल्ल्यावर ज्योत प्रज्वलित करून बुधवारी सकाळी शिवराज प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते आणि शिवप्रेमी तरुणांनी दौडण्यास सुरुवात केली. 12 किलोमीटरचे अंतर पार करून कर्जत शहरात शिवज्योत फिरविण्यात आली, शिवज्योत घेऊन धावणारे तरुण आणि आजूबाजूच्या भगव्या झेंड्यांच्या गर्दीसह चालणार्या दुचाकी असे चित्र कर्जत शहरात होते. डेक्कन जिमखाना येथे असलेल्या शिवाजी महाराज स्मारक येथे ही शिवदौड आल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार घातल्यानंतर शिवमहाआरती घेण्यात आली. सायंकाळी कर्जत शहरात शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
– जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अलिबाग : जिमाका
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील तैलचित्रास बुधवारी (दि. 19) उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी पुष्प अर्पण करून शिवरायांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के पाटील, सहाय्यक पुरवठा अधिकारी वाकोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
– नागोठण्यातही शिवजयंती
नागोठणे : छत्रपती शिवाजीमहाराजांची जयंती नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य अतूल काळे, ज्ञानेश्वर साळुंके, कल्पना टेमकर, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, कर्मचारी आणि बालवाडीच्या शिक्षिका उपस्थित होत्या.
-माणगावात रक्तदान शिबिर
माणगाव : प्रतिनिधी
शिवजयंतीचे औचित्य साधून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि.19) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात 153 जणांनी रक्तदान केले.
माणगाव तालुका पत्रकार संघ, एस. एस. निकम इंग्लिश स्कूल, जनरल नर्सिंग कॉलेज, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, छावा प्रतिष्ठान रायगड, एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन, श्री शिवछत्रपती ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज, देवा ग्रुप फाऊंडेशन आणि नमस्कार मित्र मंडळ (बोंडशेत) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी केले. परेल मुंबई येथील केईएम हॉस्पिटलच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद, पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्यासह 153 जणांनी रक्तदान केले.