कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्री नेरळ बाजार पेठेतील एक मोबाईल शॉप, किराणा दुकान व चप्पलचे दुकान फोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेरळमध्ये या आधीही एकाच रात्री झालेल्या तीन घरफोड्या झाल्या होत्या. त्या घटना ताज्या असतानाच नेरळ बाजार पेठेतील एक मोबाईल शॉप, किराणा दुकान व चप्पलचे दुकान फोडून चोरी झाल्याची घटना घडली. मोबाईल दुकानातून एक मोबाईल फोन व रोख रक्कम अशी तीस हजार रूपयांची तर किराणा दुकानातून 10, 5 व 2 रू चलनातील नाणी एकूण दोन हजार रुपये व चार हजार रुपयांच्या भारतीय चलनातील नोटा, अशी सहा हजार रूपये व काजू बदाम यांची चोरी तर चप्पलच्या दुकानातील चिल्लर चोरटयांनी लांबविल्याची घटना घडली आहे.
यासंदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे, परंतु सध्या नेरळमध्ये सुरू असलेले चोरीचे सत्र पाहाता या चोरटयांचा बंदोबस्त नेरळ पोलीसांकडून होणार का? असा प्रश्न मात्र नेरळकरांकडून उपस्थित केला जात आहे.
-आधीही घरफोडींच्या घटना
नेरळमध्ये या आधीही एकाच रात्री झालेल्या तीन घरफोड्या झाल्या होत्या. यामध्ये नेरळ विद्यामंदिर शाळेच्या परिसरात एक बंगला फोडून दोन लाख रूपयांची चोरी, त्याच परिसरातील गोकुळ धाम सोसायटी शेजारी 25 जून रोजीच्या रात्री 75 वर्षीय वृध्द व्यक्ती राहात असलेल्या बंगल्याच्या खिडकीची लोखंडी ग्रिल तोडून दागिने व आठ हजार रुपये रोख असा साधारण चार लाख 38 हजार रुपये किमतीचा माल चोरीची झाली होती.