Breaking News

कमी मतदानामुळे उमेदवारांना चिंता

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली या दोन मतदारसंघात पन्नास टक्यांपेक्षा कमी मतदान झाल्याने प्रमुख पक्षांच्या चार उमेदवारांची चिंता वाढली आहे. पावसाची रिपरिप आणि त्यानंतर कडाक्याचे उन्ह, तीन दिवसाच्या सुट्टीचा बेत, मतदानातील उदासीनता, नोकरदारांचे स्थलांतर आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवरील संशय यामुळे मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणुकीपेक्षा घसरली असल्याची चर्चा सुरू होती. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐरोली मतदारसंघात 51 टक्के तर बेलापूर मतदारसंघात 49 टक्के मतदान झाले होते. या मतदानापेक्षा या वेळी सात ते आठ टक्याने टक्केवारी घसरली असून बेलापूर मतदार संघात 44 टक्के तर ऐरोली मतदारसंघात 42 टक्के मतदान झाले. हवामान विभागाने मतदानाच्या दिवशीही पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे अनेक मतदारांनी बाहेर पडण्याचे टाळले, पण सोमवारी पाऊस न पडता कडाक्याचे उन्ह पडले. ही उन्हाची काहिलीही जास्त असल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरीकांनी संध्याकाळची वाट पाहिली. त्यामुळे सकाळी मतदानाची वाढणारी टक्केवारी घटली. शनिवार, रविवारनंतर सोमवारी झालेल्या मतदानामुळे अनेक मतदारांनी या काळात सहलीचा आनंद घेतला, तर काहीजणांनी गाव गाठले. नवी मुंबईत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील रहिवाशी मोठ्या प्रमाणात राहात आहेत. तेथील नातेवाईकांनी केलेल्या आग्रहाला प्रतिसाद म्हणून अनेक मतदारांनी शनिवारीच गाव गाठले होते. कोकणातही मतदानासाठी जाणार्‍यांची संख्या लक्षवेधी होती. नवी मुंबईतून खेड मतदार संघात मतदानासाठी जाणार्‍या एका कुटुंबातील सहा जणांच्या श्रीकांत घाग यांच्या गाडीला माणगाव येथे अपघात झाला. ही मंडळी मतदानासाठी गावी जात असल्याचे समजते. कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, तुर्भे या भागात माथाडी कामगारांची संख्या मोठी आहे. हा मतदार मोठ्या प्रमाणात आपल्या गावाकडच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी गेल्याचे दिसून आले. त्यामुळे नवी मुंबईतील मतदाराच्या स्थलांतराचा मोठा फटका बसला आहे. काही सुशिक्षित मतदारांमधील मतदान करण्यातील उदासिनता आणि मतदान करुन उपयोग काय हा ईव्हीएम यंत्रणेवरील अविश्वास यामुळे नवी मुंबईतील दोन्ही मतदार संघातील टक्केवारी घसरल्याची चर्चा आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply