Breaking News

फिल्मी स्टाइलने अपहरण

कर्जतमध्ये अपहरणकर्त्यांना तत्काळ अटक

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाचे गुरुवारी (दि. 20) रात्री साडेअकरा वाजता चार पांढर्‍या रंगाच्या गाड्यांमधून आलेल्या अज्ञात इसमांनी अपहरण केले होते. त्याबाबतची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर कर्जत पोलिसांनी अवघ्या चार तासांत अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांनी या घटनेत वापरलेल्या गाड्यादेखील  ताब्यात घेण्यात आल्या आहेत. कर्जत तालुक्यातील सांगवी येथील गणेश अनंता घारे हे अतुल घारे आणि रमेश घारे या मित्रांसोबत गुरुवारी रात्री गावानजीच्या उल्हास नदीजवळ गप्पा मारत बसले होते. रात्री अकराच्याच्या दरम्यान तेथील रस्त्यावर चार -पाच पांढर्‍या रंगाच्या गाड्या उभ्या राहिल्या. त्यातील इसम ओरडत आपल्याकडे येत असल्याने पाहून ते तिघेही पळून जाऊ लागले, मात्र गाड्यांमधून आलेल्या अज्ञात इसमांंनी  एक किलोमीटर धावत जाऊन गणेश घारे यांना पकडले आणि त्यांना गाडीमध्ये टाकून त्या गाड्या कर्जतच्या दिशेने निघून गेल्या. त्या वेळी अतुल घारे आणि रमेश घारे यांनी सांगवी गावात जाऊन घटनेची माहिती गणेश घारे यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर  गणेश यांचे बंधू योगेश अनंता घारे यांनी मध्यरात्री कर्जत पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्याकडे त्यांनी आपल्या भावाचे अपहरण झाले असल्याची तक्रार केली. त्याच वेळी गणेश यांच्या मोबाइलवर एक फोन आला आणि त्यांनी तुमचा माणूस माझ्याकडे नेरळला आहे, असे सांगितले. या माहितीच्या आधारे कर्जतचे पोलीस निरीक्षक भोर, उपनिरीक्षक गावडे यांच्यासह नेरळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील हे नेरळ गावातील आनंदवाडी येथे पोहचले. तेथे अपहरण करून आणलेल्या गणेश यांना ठेवण्यात आले होते आणि त्या खोलीत राजू बबन मरे झोपले होते. पोलिसांनी प्रथम गणेश यांची सुटका केली. त्यांच्याकडून माहिती घेऊन अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या हुंडाई वेरणा आणि इनोव्हा गाड्या तसेच गणेश यांचे अपहरण करणार्‍या पाच जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी कर्जत गाठले. या प्रकरणी राजू बबन मरे (वय 39), भूषण विक्रमसिंग राजपूत (वय 24), निलेश बुधाजी मोरे (वय 27), शाहिद आलिम शेख (वय 23), लखन अशोक गायकवाड (वय 24) आणि बाळाजी बबन पोल्ले (वय 29) यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात भादंवि कलम 163, 34खाली गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्या सर्वांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कर्जत न्यायालयाने दिले आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply