केंद्राने पाठवली आरोग्य पथके
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोेरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी देशात अद्याप महाराष्ट्रासह पाच राज्ये अशी आहेत जिथे सर्वांत जास्त रुग्ण आढळून येत आहेत. केंद्र सरकारने याबाबत चिंता व्यक्त करीत या राज्यांमध्ये आरोग्य पथके पाठविली आहेत.
याबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार म्हणाल्या की, कोरोना रुग्ण वाढत असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारने यापूर्वीच आपली पथके पाठविली आहेत. ज्या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांमध्ये घट होत नाही आहे त्यात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येत महाराष्ट्र आणि केरळचा 53 टक्के वाटा आहे.
महाराष्ट्रात अद्याप परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याचे चित्र आहे. राज्यातील आकडेवारीने पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढवली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या 10 दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमध्ये गेल्या 16 महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ पहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात फक्त गेल्या 10 दिवसांत तब्बल 79 हजार 595 नवे रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर, सातारा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे (ग्रामीण) आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण जास्त आहे.