पेण : प्रतिनिधी
पेण तालुका हौशी जलतरण संघटनेच्या वतीने येथील मामा वास्कर जलतरण तलावात 24 ते 29 फेब्रुवारीदरम्यान विनामूल्य जलतरण प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मंगेश नेने यांनी दिली. शासनाच्या क्रीडा धोरणातील अध्यादेशानुसार शालेय विद्यार्थ्यांना जलतरण स्पर्धेत जिल्हास्तरीय पाच, राज्यस्तररीय 10 व राष्ट्रीय स्तरावर खेळल्यास 20 गुण मिळतात. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळावा, तसेच या वर्षी किमान 100 खेळाडू जिल्हास्तर, 50 खेळाडू राज्यस्तर खेळविण्याचा मानस तालुका संघटनेने ठरविले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या पाल्याच्या व आपल्या स्वतःच्या शरीर स्वास्थ्यासाठी, तणावमुक्त जीवन जगण्यासाठी जलतरणाचा आनंद घेऊन या संधीचा लाभ घ्यावा आणि या माध्यमातून आपल्या तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव जलतरण क्षेत्रात प्रगतिपथावर नेण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन श्री. नेने यांनी केले आहे.