प्राग (झेक रिपब्लिक) : वृत्तसंस्था
प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा दुसर्या क्रमांकाचा खेळाडू विदित गुजराथीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. नवव्या आणि अखेरच्या फेरीत पोलंडच्या अव्वल मानांकित यान-क्रिस्तॉफ डुडा याच्याकडून विदितला पराभव पत्करावा लागला.
पराभवामुळे नवव्या फेरीअखेर पाच खेळाडूंचे समान पाच गुण झाले होते. त्यामुळे अव्वल दोन खेळाडूंमध्ये अतिजलद (ब्लिट्झ) प्रकाराची लढत खेळवण्यात आली. त्यात इराणच्या 16 वर्षीय अलिरेझा फिरौजा याने आपले कर्तृत्व सिद्ध करीत विदितवर सरशी साधून जेतेपदावर नाव कोरले. विदितला सलग दुसर्यांदा या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आठव्या आणि नवव्या फेरीत पराभूत झाल्यामुळे विदितचे विजेतेपद हुकले. भारताचा तिसर्या क्रमांकाचा खेळाडू पी. हरिकृष्ण याने मात्र बरोबरीची मालिका खंडित काढत चेक प्रजासत्ताकच्या डेव्हिड नवारा याचा पराभव केला. हरिकृष्णने 4.5 गुणांसह सातवे स्थान प्राप्त केले.