Breaking News

नेरळमध्ये पर्यायी स्टँडसाठी जागेची मागणी; रेल्वेस्थानकातील रेलिंगमुळे रिक्षा व्यवसायावर गदा

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ स्टेशनमध्ये लोखंडी रेलिंग लावल्याने ममदापूर आणि नेरळ बाजारपेठेमध्ये व्यवसाय करणार्‍या रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दरम्यान, शहरातील पत्रीपूल येथील रस्ता खुला करावा आणि युनियन बँक परिसरातील रिक्षा स्टँड पुन्हा सुरू करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी काही दिवसांपूर्वी नेरळ रेल्वे स्थानकाला भेट दिली. त्यांना दाखविण्यासाठी नेरळ स्थानकात येणारे रस्ते मध्य रेल्वेकडून बंद करण्यात आले होते. त्या वेळी शहरातील युनियन बँक भागात व्यवसाय करणार्‍या नेरळ गावातील 15 रिक्षाचालकांना रेल्वेने हटविले होते. ते सर्व रिक्षाचालक मागील महिन्यापासून 100 रुपयेदेखील घरी घेऊन जात नाहीत. त्यामुळे  मध्य रेल्वेने त्या सर्व रिक्षाचालकांना तेथे व्यवसाय सुरू करू द्यावा यासाठी भारतीय जनता पक्ष रेल्वेला विनंती करणार आहे. त्यातून मार्ग निघाला नाही तर येथील रिक्षा स्टँडसाठी आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी दिला आहे.

नेरळ स्टेशन येथून दामत, ममदापूर आणि भडवळ भागात रिक्षा जातात. त्या रिक्षा स्टँडकडे जाणार्‍या प्रवाशांचा मार्ग मध्य रेल्वे प्रशासनाने रेलिंग लावून बंद केला आहे, तसेच मुंबई एण्डकडील पत्रीपूल येथून येण्याचा मार्गही बंद केला आहे. त्या ठिकाणी लोखंडी रेलिंग लावल्याने तेथे व्यवसाय करणार्‍या रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. 

आम्ही रेल्वे कॉलनीजवळ रिक्षा स्टँड सुरू केला होता, मात्र तो लोखंडी रेलिंग लावून बंद करण्यात आला आहे. त्या ठिकाणी मध्य रेल्वेने रिक्षा स्टँडसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची

मागणी आहे.  -मंगेश म्हसकर, अध्यक्ष, कर्जत तालुका भाजप

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply