Breaking News

कोरोना, आम्ही आणि मोदी…

मनुष्यांच्या समूहाने समाज घडतो. जोपर्यंत मनुष्य एकटाच होता तोपर्यंत कोणतेही साथीचे आजार नव्हते, मात्र जेव्हापासून मानव समूहात राहू लागला तिथपासून आजार आणि साथीचे रोग पसरू लागले. कालांतराने हे आजार एका समूहाकडून दुसर्‍या समूहाकडे जाऊ लागले. जसजशी समाजरचना मजबूत होऊ लागली तेवढाच संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका वाढू लागला. निसर्गाने वेळोवेळी मानवाला याची जाणीव करून दिली, मात्र प्रगतीच्या धुंदीत असणार्‍या मनुष्यजातीने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज जगावर कोरोनासारखे महाभयंकर संकट आले आहे. विकसित देशांनीदेखील जेव्हा या महाभयंकर रोगापुढे गुडघे टेकले तिथे विकसनशील असलेल्या भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या महाभयंकर संकटाला आत्मविश्वासाने तोंड दिले. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेने भारतात मृत्यूंची संख्या कमी आहे. भारताची लोकसंख्या ही या कोरोना महामारीसोबत लढताना मोठी अडचण होती. प्रत्येक राज्याच्या सरकारांना विश्वासात घेऊन त्यांची मने सांभाळत मोदीजींना या महामारीवर विजय मिळवायचा होता. युद्धात शत्रू समोर दिसतो. त्यामुळे त्याला मारणे सोपे असते, मात्र कोरोना विषाणू उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. अशा शत्रूसोबत ही लढाई होती. पहिल्या लाटेत भारताला या महामारीविरोधात लढण्याचा अभ्यास नव्हता. त्यातच क्वारंटाइन व्हा, असे सांगत असतानाही काही बेजबाबदार नागरिक बाहेर फिरत होते आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. हा रोग हा हा म्हणता संपूर्ण देशात पसरला आणि सुरू झाली वैद्यकीय लढाई. मोदीजींच्या अभ्यासू आणि कुशल नेतृत्वाखाली राज्याराज्यांतून डॉक्टर्स, आरोग्यसेवक, सफाई कर्मचारी, पोलीस यांनी जीवाची पर्वा न करता या लढाईत महत्त्वाचे योगदान दिले. रोग पसरू नये यासाठी लॉकडाऊन गरजेचे होते, पण त्याचबरोबर गरिबांच्या पोटाची चिंता असणार्‍या संवेदनशील पंतप्रधान मोदीजींनी गरिबांना मोफत धान्यपुरवठा केला. मोफत औषधोपचार आणि लसींचा पुरवठा राज्याराज्यांना केला. कोणते राज्य भाजपचे आहे आणि कोणते नाही हे मोदींनी कधीच पाहिले नाही. सरसकट केंद्राने राज्यांना मदत केली. जागतिक पातळीवर भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईची दखल घेतली गेली. आजही ही लढाई संपलेली नाही. कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजनांबरोबर संपूर्ण जनतेचे लसीकरण हा उद्देश बाळगून केंद्राकडून लसींचे नियोजन केले जात आहे, मात्र मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती झाली आहे. तरीही प्रत्येक नागरिकाला फुकट लस मिळत आहे. थोड्या संयमाची गरज आहे. लॉकडाऊन जरी शिथिल झाला असला तरी मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझर ही तत्त्वे सोडून चालणार नाहीत. ती आता सगळ्यांची गरज झाली आहे. आज ही जबाबदारी एकट्या मोदींची नसून ती आपल्या सर्व भारतीयांची आहे. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या या देशात भारतीयांनी ठरवले तर जागतिक महासत्तांनादेखील गुडघे टेकायला लावू शकतात. कोणताही सांस्कृतिक वारसा आणि इतिहास नसलेल्या मागास चीन देशाने आज प्रगतीची जी भरभराट केली आहे आणि झपाट्याने जागतिक महासत्ता होण्याच्या वाटेवर आहे, तर आपण भारतीयच मागे का आहोत? आज आम्ही सर्व गोष्टींसाठी चीन, कोरिया, अमेरिका यांसारख्या देशांवर अवलंबून आहोत. हे चित्र जर बदलायचे असेल तर भारतीय ब्रॅण्ड निर्माण व्हायला हवेत आणि हेच तत्त्व घेऊन नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची संकल्पना पुढे आणली. आज कोरोनाविरोधात प्रभावी ठरणार्‍या लसींची निर्मिती भारतात होऊ लागली आहे. केवळ भारतासाठीच नाही तर आज आपण ही लस इतर देशांनादेखील पुरवीत आहोत. भारताचे जागतिक महासत्ता होण्याच्या वाटेवर हे पहिले पाऊल आहे, पण ही जबाबदारी एकट्या मोदींची नाही. आपल्याला प्रत्येकाला यात योगदान द्यावे लागणार आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत आज वेगाने प्रगती करीत आहे. त्यामुळे भविष्यात मोदींना हरविण्यासाठी या सर्व शक्ती एकवटणार आहेत, मात्र आज भारतीयांना कळून चुकले आहे की मोदीजींसारखा पंतप्रधान देशाला याआधी कधी मिळाला नव्हता आणि भविष्यातही मिळणार नाही. केवळ कोरोनाविरुद्धची लढाईच मोदी जिंकले नाहीत, तर देशाला स्थैर्य आणि जगात सन्मान मिळवून देण्यातही मोदी यशस्वी ठरले आहेत. कोरोनाला हरवू या आणि देशाला जिंकवू या…!     

-महेश शिंदे, महाड

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply