शिवसेनेसारखा एखादा तोंडाळ पक्ष कितीही वल्गना करू लागला तरी त्याला काही अर्थ नाही. बैलगाडीच्या धुरेवर बसलेल्या माशीला असे वाटू लागले की ही बैलगाडी आपणच चालवितो आहोत तर तिला हसावे की रडावे? हिंदुत्वाची आपली मतपेढी शक्यतो सांभाळावी या विचारामुळेच शिवसेनेला अधुनमधुन हिंदुत्वाची अशी हाकाटी करावी लागते हे उघड आहे. भारतीय जनता पक्षाला त्याची गरज नव्हती आणि नाही.
धुळवड आणि रंगपंचमीचा सण उंबरठ्याशी येऊन ठेपला आहे. तरुणाईची टोळकी आता विविध रंगांत न्हाऊन निघतील. सोसायट्या, वाड्या-वस्त्यांमधले उत्साही रहिवासी रंगांच्या पिचकार्या घेऊन बेधुंदीने धुळवड आणि रंगपंचमी साजरी करतील. रंगपंचमी खेळताना साधारणपणे नैसर्गिक व सुरक्षित रंगांनी सण साजरा करावा अशा सूचना दिल्या जातात. नैसर्गिक रंग हे प्रकृतीला अपायकारक नसतात. रासायनिक रंग प्रकृतीस अपाय करतातच. परंतु ते बटबटीत देखील असतात. शिवसेनेने सध्या धारण केलेला हिंदुत्वाचा भगवा रंग असाच अनैसर्गिक, रासायनिक आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रकृतीस अपायकारक वाटतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना नावाची मराठी माणसांची संघटना आता बहुदा इतिहासजमा झालेली आहे. आताची शिवसेना ही सत्तेसाठी कुणाशीही फंदफितुरी करणारी, मतांच्या गठ्ठ्यांसाठी हवेतसे रंग बदलणारी अशी संधीसाधू सेना उरली आहे. महाराष्ट्रातील तीन चाकी आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाऊन आले. गेल्या वर्षभरातली त्यांची ही तिसरी अयोध्यावारी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मागल्या दाराने सत्ता काबीज केल्यानंतर शिवसेनेच्या हिंदुत्वाचे आता काय असा प्रश्न स्वाभाविकपणे विचारवंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांच्या मनात उभा राहिला. शिवसेनेचे हिंदुत्व हे सोयीपुरते आहे हे यानिमित्ताने ठळकपणाने समोर आले हे एका अर्थाने बरेच झाले. इतकी वर्षे हिंदुत्वाची टिमकी वाजवणार्या या संघटनेला सत्तेसाठी वाट्टेल ते खुंटीवर टांगता येते हे लोकांना कळून चुकले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन नको ती वक्तव्ये देखील केली. ‘आम्ही भाजपपासून वेगळे झालो आहोत, हिंदुत्वापासून नव्हे’ अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी अयोध्येत दिली तेव्हा तेथील संत-महंत आणि रामभक्त खो खो हसले असतील. हे असे खुलासे त्यांना का बरे करावेसे वाटत असावेत? श्रीराममंदिरासाठी भारतीय जनता पक्षाने किती खस्ता खाल्ल्या आणि किती जणांनी त्या ऐतिहाससिक आंदोलनापायी आपले जीवन श्रीरामार्पण केले याची पूर्ण कल्पना अवघ्या भारतातील तमाम हिंदु बंधुभगिनींना आहे. त्यामुळे ‘भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे’ ही ठाकरे यांची मल्लिनाथी हास्यास्पद ठरते. भाजपसारखा पक्ष हा कोट्यवधी रामभक्तांच्या आणि हिंदुंच्या त्यागाच्या जोरावर प्रबळ झाला आहे. महाराष्ट्रातील तीन चाकी आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाले याचे त्यांचे त्यांनाच हायसे वाटले असावे. या सरकारची बहुतेक शक्ती खुर्ची टिकवण्यातच निघून जाते आहे. न जाणो यदाकदाचित मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या तर आपला हिंदुत्वाचा खोटा आव टिकवलेला बरा अशा मखलाशीने शिवसेना नेतृत्वाच्या अयोध्या वार्या सुरू आहेत. त्या सुखाने सुरू राहोत. रासायनिक आणि घातक भगवा रंग कुठला हे जनतेने पुरते ओळखले आहे.