Breaking News

तरुणाची जिद्द : 11 दिवसांत 1666 किमीचा सायकल प्रवास

कर्जत तालुक्यातील वारे या गावातील मूळचा रहिवासी असलेल्या अक्षय हरिचंद्र म्हसे या नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या तरुणाने विशाखापट्टणम ते कर्जत असा तब्बल 1666 किलोमीटरचा सायकल प्रवास केला. काश्मीर ते कन्याकुमारी, लेह-लढाख या सारख्या असंख्य सायकल टूर करणार्‍या नेव्ही बॉयने आपल्या विशाखापट्टणम येथील कार्यालयातून मुंबई म्हणजे पूर्व किनारपट्टी ते पश्चिम किनारपट्टी असा सायकल प्रवास करण्याचा निर्णय घेऊन हा तरुण कर्जत आता मुंबईत पोहचला आहे. लवकरच हा नेव्ही बॉय अक्षय म्हसे मुंबई येथील नेव्हीच्या मुख्यालय रुजू होणार आहे, यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रवासाबद्दल सर्वत्र कौतुक केले.

हरिचंद्र म्हसे हे कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या वारे गावातील रहिवासी.शेतकरी कुटुंब असलेल्या या म्हसे कुटुंबातील हरिचंद्र म्हसे हे भिवंडी नगरपरिषदमध्ये नोकरीला होते. नंतर भिवंडी निजामपूर महानगरपालिका झाल्यानंतर निवृत्त झालेले हरिचंद्र म्हसे यांनी आपल्या मेव्हण्याची भारतीय सैन्यदलातील सेवा बघून आपल्या मुलाला सैन्यात भरती करण्याचा निर्णय घेतला. भारतीय लष्करात थळसेनेत जवान असलेला आपला मामा संतोष निलघे यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन 2015 मध्ये अक्षय हा इंडियन नेव्हीमध्ये रुजू झाला. त्यानंतर पाच वर्षे नेव्हीच्या विशाखापट्टणम येथील तळावर अक्षय सेवा बजावत होता.तेथे पाच वर्षांची यशस्वी सेवा करून त्यांची 2020 मध्ये नेव्हीच्या मुंबई येथील मुख्यालयात बदली झाली होती. त्यामुळे आपण आपली सेवा यशस्वीपणे पार पाडली असल्याने मुंबईत बदलीच्या ठिकाणी जाताना काहीतरी वेगळ्या पद्धतीने गेले पाहिजे आता विचार अक्षय यांनी आपल्या मामाकडे व्यक्त केला.

त्याआधी अक्षय म्हसे यांनी आपली सायकल आवड ही देशातील आघाडीच्या सायकल टूरमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामुळे आपण ज्या ठिकाणी सेवा केली त्या विशाखापट्टणम पासून मुंबई असा एकदातरी सायकल प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अक्षय यांचे मित्र आणि त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत नेव्हीबॉय अक्षय म्हसे यांनी सायकलवरून त्यांची सेवा करीत असलेल्या ठिकाणी विशाखापट्टण ते मुंबई असा प्रवास करण्याचा कार्यक्रम निश्चित केला. त्यानंतर अक्षय म्हसे यांनी 21 फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणम येथून सायकलवरून कर्जत आणि कर्जत येथून मुंबई जाण्याचा प्रवास सुरु केला. 11 दिवसात तब्बल 1666 किलोमीटर प्रवास सायकलवरून पार करून अक्षय आधी आपल्या कर्जतच्या घरी आणि नंतर आपल्या नवीन कार्यालय असलेल्या नेव्ही डॉकयार्ड येथील कार्यालयात पोहचला आहे.

आंध्र प्रदेश या भारताच्या पूर्व किनारपट्टी येथील विशाखापट्टणम येथील नेव्ही कॅम्प येथून प्रवास सुरु करणार्‍या अक्षय म्हसे यांनी तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा चार राज्यातील 11 जिल्ह्यातून सायकल प्रवास करीत मुंबई हे पश्चिम किनारपट्टी गाठली. 21 फेब्रुवारी रोजी निघालेल्या अक्षय म्हसे यांनी पहिल्या दिवशी 154 किलोमीटर प्रवास करून पिठापुरम येथे पहिला मुक्काम केला.त्यानंतर गोदावरी नदीच्या भल्यामोठ्या पात्राच्या कडेने दुसरा दिवस प्रवास करीत दम्मापेठ येथे मुक्काम करीत तिसर्‍या दिवशी सूर्यपेठ या शहरात मुक्काम केला. हैद्राबाद मध्ये त्यांना समोरून येणार्‍या वार्‍याच्या दिशेने प्रवास करावा लागला आणि त्या दिवशी ढगाळ वातावरण असल्याने चारमिनार पाहता आले नाही. पुढे गुणाबादमध्ये मुक्काम करून नंतर अक्कलकोट करून तुळजापूर दर्शन घेऊन पुन्हा सोलापूर येथे मुक्काम केला. अक्षय यांचे तुळजापूर आणि पंढरपूरमध्ये जोरदार स्वागत झाले.

पंढरपूर येथे मुक्काम करून निघालेल्या अक्षय यांचा खंडोबाच्या जेजुरीत देखील जोरदार स्वागत झाले. पुढे जेजुरी येथून पुणे करीत कर्जत गाठले आणि कर्जतकरांनी मोठ्या संख्येने त्यांच्या आनंदात आपला सहभाग नोंदवत कर्जतमध्ये ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. कर्जत येथे आपल्या घरी मुक्काम करून मुंबई असा प्रवास करीत असताना नवी मुंबईत आणि मुंबईत गेल्यावर मोठे स्वागत झाले.केवळ जिद्द आणि आपण काम केलेल्या ठिकाणांपासून आपल्या घरी आणि नवीन मुख्यालयी सायकल प्रवास ही संकल्पना मोठी चर्चेचा विषय बनली आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply