प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांची माहिती

माणगाव : प्रतिनिधी
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी प्रांत कार्यालयात माणगाव उपविभागांतर्गत माणगाव व तळा तालुक्यातील महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, व्यापारी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, पंचायत समिती व नगरपंचायत विभाग यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत कोरोना विषाणू आजाराच्या लक्षणांबाबत तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून कोरोना विषाणू संक्रमित होऊ नये म्हणून घ्यावयाच्या काळजीबाबत व्यापक जनजागृती करणे, कोरोना विषाणू संक्रमणाची संभावना विचारात घेऊन संक्रमित व्यक्तींच्या उपचारासाठी माणगाव येथे आवश्यक बेड उपलब्ध होतील असे नियोजन करावे, व्हेंटिलेटर एन95 मास्क, अद्ययावत अॅम्ब्युलन्स इत्यादी सुविधांचे मॅपिंग करावे, क्लस्टर कंटेंटमेन्ट प्लॅन तयार करावा, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांमध्ये आवश्यकतेप्रमाणे आयसोलेशन वर्ड, व्हेंटिलेटर, मास्क एन95, पुरेसा औषधसाठा उपलब्ध होईल असे नियोजन करावे, मास्क व इतर औषधे जास्त दराने विक्री होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, सर्व औषध पुरवठादारांना याबाबत सक्त सूचना देण्यात याव्यात, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मास्क विक्री करू नये, अशा सूचना वितरकांना द्याव्यात, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकार्यांनी उपस्थित राहावे, वैद्यकीय अधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, दोन्ही तालुक्यांतील हॉटेल्समध्ये परदेशी व्यक्तींकडून फॉर्म सीमधून माहिती भरून घ्यावी, त्यासाठी पोलीस विभागाने बैठका घेऊन सूचना द्याव्यात, हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या परदेशी व्यक्तींची तपासणी आरोग्य विभागाने करावी, मेळावे, जत्रा, समारंभ, मोठ्या स्पर्धा इत्यादी गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये, आदी सूचना या बैठकीत करण्यात आल्या.
कोरोना विषाणूसंदर्भात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती पाहता सदर विषाणूंचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम आयोजित करू नयेत.
-प्रशाली जाधव-दिघावकर, प्रांताधिकारी, माणगाव