जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन
अलिबाग ः प्रतिनिधी – परराज्यातील जे लोक कामधंद्यासाठी रायगड जिल्ह्यात आले आहेत, त्यांनी लॉकडाऊनमुळे आपल्या मूळगावी जाऊ नये. या जिल्ह्यात तुम्ही सुरक्षित आहात. आपल्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थ जिल्हा प्रशासन करेल, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.रायगडातील उद्योग समूहांत, बांधकाम क्षेत्रात परराज्यातील हजारो लोक काम करीत आहेत, परंतु कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. परिणामी काम नसल्यामुळे तसेच निवास व जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे हे कामगार आपल्या मूळ गावी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आपल्या निवासासाठी रायगड जिल्ह्यात व्यवस्था केली जाईल. जेवण, आरोग्य, निवास आदी सुविधा दिल्या जातील. हे आपलेच घर आहे. त्यामुळे कुणीही जिल्ह्याची वेस ओलांडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या इतर भागातून व अन्य राज्यांमधून कामानिमित्त आलेले कामगार आहेत. त्यातील काही कामगार संचारबंदी लागू होण्यापूर्वी आपल्या मूळ गावी परत गेले आहेत, परंतु काही कामगार जिल्ह्यात अडकून पडले आहेत. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्यामुळे कामगार आपल्या मूळ गावी जाऊ शकत नाहीत. शिवाय हे कामगार जेथे काम करीत आहेत त्या कंपन्यादेखील बंद आहेत. या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत चालू असणार्या कंपन्यांत मनुष्यबळाची आवश्यकताही असल्याने तालुक्यात आढळून येणार्या कामगारांशी समन्वय साधून या काम नसलेल्या कामगारांना माणुसकीच्या भावनेतून अशा सुरू असलेल्या कंपन्यांत तात्पुरत्या स्वरूपात काम देण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रतिबंध करताना सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्ह्यात सुरू असणार्या विविध कंपन्यांनी आपल्याकडील सीएसआर फंडामधून आपल्या कारखान्यांमध्ये कार्यरत कामगार, त्यांचे कुटुंबीय तसेच कारखान्याच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घ्यावे व त्यांना कोरोना विषाणूपासून प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयीचे प्रशिक्षण द्यावे. तसेच कारखान्याचा परिसर व आजूबाजूच्या गावांमध्ये जंतुनाशक फवारणी करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कंपन्यांना केले आहे.
रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा आहे. रायगडकरांचे मन मोठे आहे. रायगडकर परिस्थितीचे गांभीर्य ओळखतात. रायगडकर माणुसकीच्या नात्याने तुम्हाला मदत करतील. त्यामुळे परराज्यातील कामगारांनी हा जिल्हा सोडून आपल्या मूळ गावी जाऊ नये.
-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड.