Breaking News

पनवेल महापालिका हद्दीत घरोघरी कोरोना तपासणी

पनवेल : वार्ताहर
जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका हद्दीत घरोघरी जाऊन तपासणी करण्यास शनिवार (दि. 28)पासून सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घेत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. वैयक्तिक स्वच्छता राखावी. कोरोनाची लक्षणे जाणवताच जवळील रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात परदेश प्रवास करून आलेल्या प्रवाशांची संख्या 1065 असून एकूण 26 रुग्णांना मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 18 रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. इतर सर्वांना घरीच अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. एका बाधित रुग्णाची उपचारानंतर केलेली चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यास घरी पाठविले आहे, तर एका पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती उत्तम आहे. सध्या परदेशातून पनवेल येथे आलेल्या प्रवाशांना घरी अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे आणि ज्यांना त्रास आहे, त्यांना आयसीएमआरने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांमार्फत त्यांच्या घरी जाऊन चाचणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने या सर्वांची घरोघरी जाऊन कोरोनासंबंधित काही लक्षणे आहेत का? तसेच त्यांची प्रकृती कशी आहे याची तपासणी होणार आहे. यासाठी विशेष पथके तयार केली आहेत.
परदेशातून आलेल्या नागरिकांनाच आतापर्यंत या आजाराची लागण झाल्याने त्यांच्या तपासणीसाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असून या प्रवाशांची घरी जाऊन तपासणी करणे हा त्याचाच एक भाग आहे. ही तपासणी आपल्या आरोग्यासाठी व साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी असून पथक घरी आल्यानंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पथकास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
प्रतिबंधात्मक औषध फवारणी
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पनवेल महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून औषध फवारणी सुरू केली गेली आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण मनपा हद्दीत सोडियम हायपोक्लोराईट हे औषध फवारले जात आहे. प्रभाग 15 म्हणजेच खांदा कॉलनीतही औषध फवारणीस सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी प्रभाग समिती सभापती नगरसेवक संजय भोपी, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीता पाटील, महापालिका कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अन्य प्रभागांमध्येही भाजप नगरसेवक जातीने उपस्थित राहून फवारणी करून घेत आहेत. ही फवारणी इमारत, फुटपाथ आणि आजूबाजूच्या परिसरात करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply