कर्जत ः बातमीदार
माथेरानमधील आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असताना येथील आरोग्यसेवेबरोबर रुग्णवाहिकेचादेखील खेळखंडोबा सुरू आहे. शासनाच्या रुग्णवाहिकेसह येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी दिवसरात्र कार्यरत राहून सेवा देत असलेल्या दोन्ही रुग्णवाहिका एकाच वेळी नादुरुस्त झाल्याने एका गरोदर महिलेची प्रसूती काळात प्रकृती खालावल्याने तिच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. या परिस्थितीत वाहनास बंदी असलेल्या माथेरान शहराचा कायदा बाजूला ठेवून माणुसकीचे दर्शन घडवत एका गरोदर महिलेचा जीव वाचविण्यासाठी माथेरानच्या पोलिसांनी गरोदर महिलेची मदत केली. माथेरानमध्ये मोलमजुरी करण्यासाठी बाहेर गावावरून उदरनिर्वाहासाठी एका खाजगी हॉटेलमध्ये काम करून प्रपंच चालविणारी सर्वसामान्य अजिता आलेमगर (35) या गरोदर महिलेची माथेरान पोलीस सर्वतोपरी काळजी घेत होते. त्या गरोदर महिलेच्या पोटात असलेल्या अर्भकाला वाचविण्यासाठी कायदा बाजूला ठेवून माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांनी माथेरान दस्तुरी नाका येथून रात्री तत्काळ खाजगी वाहनाने त्या गरोदर महिलेला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले. रुग्णवाहिकेसंदर्भात माथेरानच्या मुख्याधिकार्यांना विचारणा केली असता गरोदर पेशंट आहे असे रात्री समजले होते. त्यांनी नेरळ येथून रुग्णवाहिका मागवा, असे सांगून आपली जबाबदारी झटकली आहे, मात्र प्रशासनाच्या साठेमारीत पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडून गरोदर महिलेला आधार दिल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.