Breaking News

उरणकरांमध्ये कोरोनाबरोबरच बिबट्याची दहशत

नागाव परिसरात मुक्त संचारामुळे भीतीचे वातावरण; शेतातील मळ्यात आढळले पायांचे ठसे

उरण : रामप्रहर वृत्त

कोरोना विषाणूची दहशत असतानाच बिबट्यानेही दहशत निर्माण केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून उरणच्या नेव्हल परिसरात बिबट्याचे दर्शन झाले असताना शुक्रवारी रात्री उरण नागाव मांडलआली येथील शेतातील मळ्यात बिबट्याच्या पायांचे ठसे सापडले आहेत. यापूर्वी उरण मोरा येथील रहिवाशांना तो दिसला होता. यामुळे कोरोनाबरोबरच बिबट्याच्या भीतीचा सामनाही उरणकरांना करावा लागत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. उरण शहरालगत असलेला नेव्हल परिसर हा डोंगरालगत वसला आहे. नेव्हलचा हा परिसर सर्वसामान्यांसाठी प्रतिबंधित   असून या ठिकाणी कर्मचार्‍यांसाठी वसाहत, शाळा, दवाखाना आणि दारुगोळा ठेवण्यासाठी डेपो एरिया तयार करण्यात आलेला आहे. त्यातच, सुरक्षिततेच्या दृष्टीने एका मोठ्या डोंगराच्या कुशीत वसविण्यात आलेल्या या परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्या दिसून आल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे हा संपूर्ण परिसर आणि आसपासच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी या परिसरात असलेल्या जुन्या पिम जेट्टीनजीक गेल्या काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास बिबट्या दिसून आला होता. याच ठिकाणी बिबट्याच्या पायांचे ठसेदेखील आढळून आले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि. 27) रात्री नागाव मांडलआली येथील शेतमळ्यात बिबट्याच्या पायांचे ठसे सापडले आहेत. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे उघड होते.काही दिवसांपूर्वी याच नेव्हल परिसरालगत असलेल्या उरण मोरा दरम्यानच्या मुख्य मार्गावर बिबट्या दिसून आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मोरा गावानजिक असलेल्या मैदानालगतच्या रस्त्यावरून  मोरा येथील आपल्या घरी परतत असताना मोटरसायकलवरून जाणार्‍या दोन तरुणांनी अवघ्या काही फुटांच्या अंतरावर बिबट्याने रस्त्यावर उडी मारलेली आणि घराच्या बाजूला असलेल्या गल्लीतून मागच्या बाजूला गेल्याचे पाहिले होते. या वेळी अचानक समोर आलेल्या बिबट्याला पाहून या तरुणांनी थेट मोरा पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. या बिबट्याची लांबी किमान तीन ते चार फुटांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर शुक्रवारी  रात्रीच्या सुमारास एका शेतमळ्यात बिबट्याच्या पायांचे ठसे बिबट्या शेतकर्‍याला सापडले. त्या पायांचे ठसे बिबट्याचेच असल्याचे जाणकार व्यक्तींनी सांगितले आहे. त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेला नाही. शुक्रवारी रात्रीच्या घटनेमुळे या संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. उरण मोरानंतर उरण नागाव परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे सापडल्याने या परिसरात नेमके किती बिबटे आहेत, याची शहानिशा करणे गरजेचे असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. तर एखादा बिबट्या हा या परिसरातील वस्तीमध्ये शिरल्यास मोठी तारांबळ उडण्याचीही भिती व्यक्त करण्यात येत आहे.

वनविभागापुढे शोधमोहिमेचे आव्हान

गेल्या काही वर्षांपासून उरण तालुक्यातील अनेक भागात बिबट्या दिसून आल्याचे सांगण्यात येत असून नेव्हल परिसरालगत असलेल्या बोरी गावातही अनेकवेळा बिबट्या दिसून आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच शुक्रवारी नागाव मांडलआली येथे बिबट्याच्या पायांचे ठसे सापडले आहेत. त्यामुळे उरण तालुक्यात बिबट्याची कोणतीही नोंद नसल्याने हा बिबट्या नेमका आला कसा? याचा शोध घेण्याचे आव्हान वनविभागापुढे उभे ठाकले आहे. आधीच कोरोना विषाणूमुळे  जगात बळींचा आकडा फुगत चालला आहे. त्यात बिबट्याच्या वावरामुळे उरणच्या जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply