पुणे ः प्रतिनिधी
पुण्यात एका सोसायटीच्या मीटिंगमध्ये पाण्यावरून चर्चा सुरू असताना सोसायटीच्या चेअरमनने एका सदस्याला शिवीगाळ करत त्याच्याविरोधात जातीवाचक उद्गार काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
कात्रज येथील भारती विहार सोसायटीमध्ये 31 मार्चला हा प्रकार घडला. या प्रकरणी विश्वजीत कीर्तिकर यांनी 5 एप्रिल रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोसायटीच्या बैठकीत जातीवाचक उद्गार काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही वारंवार अशी वक्तव्य करण्यात आली होती, पण आम्ही त्याचा बाऊ केला नाही. आता मात्र प्रकरण हाताबाहेर गेल्यानेच तक्रार करावी लागल्याचे कीर्तिकर म्हणाले. गेल्या दोन महिन्यांपासून सोसायटीत पाण्याचे समान वाटप होत नव्हते. या सोसायटीचे चेअरमन मिलिंद पाटील आणि त्यांचे मित्र सोसायटीच्या ए आणि बी विंगमध्ये राहतात. त्यांना 24 तास पाणी मिळत असल्याने मी सोसायटीत याबाबत विषय काढला. सोसायटीच्या कारभारावर ताशेरे ओढले असता पाटील यांनी माझ्या कानशिलात लगावली आणि मला लाथाबुक्क्यांनी मारले. त्यानंतर पाटील यांनी माझ्या जातीवरून बोलायला सुरुवात केली. तू अनुसूचित जातीतला असून तुला सोसायटीत राहण्याचा अधिकार नाही, असे पाटील मला म्हणाले. हा प्रकार मी सोसायटीतील लोकांना सांगितला असता त्यांनी मला पाठिंबा देत चेअरमनचा निषेध नोंदवणारी बॅनर्स सोसायटीबाहेर लावली, तसेच चेअरमनची हाकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली, असे कीर्तिकर म्हणाले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत. शिवाय साक्षीदारांची साक्ष नोंदवली जात असून अद्यापपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) विश्वेश्वर नांदेडकर यांनी सांगितले आहे.