नऊ जण होम क्वारंटाइन; पाच जणांना सोडले घरी
कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यात कोरोनाबाबत प्रशासनाने कडक अंमलबजावणी केल्याने कोरोनापासून हा भाग फार दूर आहे. कर्जत मुद्रे भागातील काही परदेश दौरा करून आलेल्या नागरिकांमुळे निर्माण झालेले भीतीचे वादळ निगेटिव्ह रिपोर्टमुळे शांत झाले आहे. कर्जतमध्ये नऊ जण संक्रमण केंद्रात उपचार घेत आहेत, तर नऊ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. कर्जतमध्ये अद्याप पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसून पाच जण संक्रमण केंद्रातून 14 दिवसांची निगराणी पूर्ण करून घरी पोहचले आहेत. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती आणि नगर परिषदांनी आपले परिसर निर्जंतुक करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील सर्व प्रभागात परिसर निर्जंतुक करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कर्जत शहरपाठोपाठ मुद्रे, गुंडगे परिसर निर्जंतुक करण्यात आला असून शहराच्या अन्य भागात पालिकेची अग्निशमन यंत्रणा त्यात औषधे घालून फवारणी करीत आहे. कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या देखरेखीखाली नगर परिषद कार्यालयाच्या परिसरातून निर्जंतुकीकरण मोहीम सुरू करण्यात आली. अग्निशमन दलाचे प्रदीप हिरे, मारुती रोकडे, दिनेश हिरे यांनी फवारणी केली. या वेळी नगपरिषदेचे अधीक्षक जितेंद्र गोसावी, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे हे नजर ठेवून असून माजी नगरसेवक संतोष पाटील, दीपक मोरे यांनी स्वतःचे प्रभाग निर्जंतुक करून घेतले. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी लहान पंपांच्या मदतीने परिसर निर्जंतुक करण्याची मोहीम हाती घेतली आहे.