मोहोपाडा : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रसायनी पाताळगंगा परिसराची मुख्य बाजारपेठ असणार्या मोहोपाडा शहराची बाजारपेठ सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत सुरू आहे. या वेळी आसपासच्या परिसरातील नागरिक जीवनावश्यक वस्तू मिळतील म्हणून यासाठी गर्दी करीत आहेत. यातच काही भाजीपाला, किराणा दुकानदार चढ्या भावाने वस्तू विकत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कोरोनाशी लढायचे असेल तर सोशल डिस्टसिंगशिवाय कुठलाही पर्याय नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. घरातच राहिल्याशिवाय कोरोनाचा प्रसार थांबत नाही. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशभरात संचारबंदी, लॉकडाऊन असतानाही नागरिक घराबाहेर दिसतात. यासाठी रसायनी पोलिसांनी कडक धोरण स्विकारले आहे. मोहोपाडा बाजारपेठेतील दुकानदार ग्राहकांना काही अंतर ठेवून किराणा माल देताना दिसत आहे. परंतु भाजी विक्रेते कोणतेही बंधन न पाळता चढ्या दराने विक्री करीत आहेत. टोमॅटो 80 ते 100 रुपये किलो, मिरची 120 रुपये किलो, वांगी 120 रुपये, कोथिंबीरची जुडी 70 ते 80 रुपये दराने भाव असल्याचे विजय चव्हाण यांच्या पत्नीने सांगून विक्री केली. तसेच बाजारपेठेतील काही दुकानदारही चढ्या भावाने विक्री करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.