नवी मुंबई : बातमीदार
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. तसेच दुकानदारांनाही दुकाने खुली ठेवताना काही निर्बंध घातले गेले आहेत. गेले चार महिने बंद असलेल्या व्यवसायामुळे उपासमारीची वेळ आलेल्या व्यापार्यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे सहकार्यासाठी दाद मगितली आहे. आमदार म्हात्रे यांनी नवी मुंबईतील व्यापारी व दुकानदारांच्या व्यथा लक्षात घेऊन अनलॉकडाऊन काळात नवी मुंबईतील सर्व मॉल्स व दुकाने संपूर्ण वेळ खुली ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांजकडे केली आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीनंतर अनलॉकडाऊन काळात काही नियम व अटी शिथिल करून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मॉल्स खुली करण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु ती पुन्हा रद्द करून मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आले. दुकानांबाबतही उजव्या-डाव्या अशा आजूबाजू पद्धतीने दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु असे असतानाही कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच आहे. दुकाने व मॉल्स एकत्रित खुली केल्यास ग्राहकांचा जमाव एकाच ठिकाणी जमा न होता विखुरली जातील, त्यामुळे एकमेकांचा संपर्क होणे टाळता येऊ शकेल. याआधीच गेले चार महिने मॉल्स बंद असल्याने अशा बिकट परिस्थितीत व्यापार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मॉल्स व दुकाने सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम लावून संपूर्ण वेळ खुली करण्यास परवानगी दिल्यास नागरिकांनाही खरेदी करण्यास अडचणी येणार नाहीत तसेच संचारबंदीमुळे ठप्प झालेला व्यापार्यांचा व्यवसाय पूर्ववत होण्यास मदत होईल. यासाठी अनलॉकडाऊन काळात नवी मुंबईतील मॉल्स व दुकाने संपूर्ण वेळ खुली ठेवण्यास परवानगी देण्यासंदर्भात महापालिका आयुक्त यांजकडे आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे. आयुक्तांनी देखील आ. म्हात्रे यांच्या सुचनेबाबत पुन्हा विचारविनिमय करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.