नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनाशी लढाई म्हणजे जीवन-मरणाची लढाई आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी लष्मणरेषा पाळावीच लागेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी रविवारी (दि. 29) मन की बात या आपल्या विशेष कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदींनी ’मन की बात’मध्ये सुरुवातीलाच देशवासीयांची माफी मागत असल्याचे सांगितले. काही कठोर निर्णय घ्यावे लागले, ज्यामुळे अनेकांना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. काही लोक माझ्यावर नाराज असतील. मी तुमची समस्या समजू शकतो, परंतु जगभरातील परिस्थिती पाहता कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. प्रत्येकाला हा विषाणू आव्हान देत आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र येत कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, लॉकडाऊन सर्वांना वाचवण्यासाठी केला आहे. तुम्हाला स्वत:ला वाचवायचे आहे. तुमच्या कुटुंबाला वाचवायचे आहे. जगात सर्व सुखांचे साधन आपले आरोग्य आहे, मात्र काही लोक नियम मोडून आपल्या आरोग्याशी, जीवाशी खेळ करीत आहेत. जगभरातील अशा प्रकारे नियमांचे पालन न करणारे लोक आज पश्चाताप करीत आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
देशात सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे कठीण परिस्थिती बनली आहे, मात्र जे लोक परदेशातून आले आहेत किंवा जे लोक अत्यावश्यक सुविधा पुरवण्यासाठी घराबाहेर पडत आहेत त्यांच्याशी इतर लोक चुकीच्या पद्धतीने वागत आहेत. त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. ही बाब चुकीची असून आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की सध्याच्या काळात आपल्याला सोशल डिस्टन्सिंग राखायचेय, इमोशनल डिस्टन्सिंग नाही. असे लोक कोणी अपराधी नाहीत, तर ते विषाणूने पीडित आहेत. अशा लोकांनी दुसर्यांना लागण होऊ नये म्हणून स्वतःला वेगळे करून घेतले आहे. अनेक ठिकाणी लोकांनी आपल्या जबाबदार्यांना गांभीर्याने घेतले आहे. काहींनी तर या आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नसतानाही स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. असे त्यांनी यासाठी केले, कारण ते परदेशातून परत मायदेशात आले आहेत आणि ते दुप्पट काळजी घेत आहेत. ते हे सांगू इच्छित आहेत की, कोणत्याही परिस्थितीत कोणी दुसरा व्यक्ती आपल्यामुळे बाधित होता कामा नये. त्यामुळे जर लोक स्वतःहून अशी जबाबदारी दाखवत आहेत, तर त्यांना वाईट वागणूक देणे हे कोणत्याही प्रकारे योग्य नाही. उलट त्यांच्यासोबत सहानुभूतीपूर्वक वागायला हवे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
’मन की बात’दरम्यान पंतप्रधान मोदींनी कोरोनाशी यशस्वी लढा देणार्या आयटी क्षेत्रातील राम यांच्याशी संवाद साधला. लंडनहून भारतात परतलेल्या राम यांना कोरोनाची लागण झाली होती, परंतु त्यांनी डॉक्टरांनी, प्रशासनाने सांगितलेल्या प्रत्येक नियमाचे योग्य पालन केले व आज ते पूर्णपणे स्वस्थ आहेत. मोदींनी पुण्यातील डॉ. बोरसे यांच्याशीही संवाद साधला. डॉ. बोरसे यांनी कोरोना संशयितांनी घरीच राहावे. सतत हात धुवावेत. सॅनिटायझर नसल्यास साबणाने हात धुतले तरी योग्य असल्याचे सांगितले. खोकला, सर्दी झाल्यास तोंडावर रूमाल ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाविरोधात आपण यशस्वी लढाई जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या संकटाच्या काळात गरिबांना, भुकेल्यांना आपण मदत करायला हवी. हेच आपले संस्कार आणि हीच आपली संस्कृती आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पथ्य आणि योग्य उपचाराने कोरोनावर मात करता येणे शक्य आहे, असे म्हणत त्यांनी कोरोनापीडितांना दिलासाही दिला.
’फ्रन्ट लाइन सोल्जर्स’चे आभार या संकटाच्या काळात अनेक डॉक्टर्स, नर्सेस, पॅरा मेडिकल स्टाफ, पोलीस, दुकानदार असे अनेक ’फ्रन्ट लाइन सोल्जर्स’ आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना सोयीसुविधा पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढ्यात अहोरात्र काम करणार्या सर्वांचे पंतप्रधान मोदींनी या वेळी आभार मानले. त्याचप्रमाणे कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वांनी योगदान देण्याचे सूचित केले.