अलिबाग ः प्रतिनिधी
दिवाळीपासून रायगड जिल्ह्यात पर्यटन हंगाम सुरू होतो, परंतु यंदा परतीचा पाऊस आणि चक्रीवादळाचा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. दिवाळीची सुटी असतानादेखील रायगड जिल्ह्यात फार कमी पर्यटक येत आहेत.
गोव्यापाठोपाठ कोकणातील समुद्रकिनार्यांनी पर्यटकांना भुरळ पाडली आहे. नारळी-पोफळीच्या बागा, रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि फेसाळणार्या लाटा यामुळे रायगडचे समुद्रकिनारे पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण ठरत आहेत. अलिबाग, मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वर, किहीम, नागाव असे समुद्रकिनारे आहेत. हे समुद्रकिनारे दिवाळीच्या सुटीत फुलून जातात, परंतु अजूनही पाऊस पडत आहे. त्याचबरोबर क्यार आणि ‘महा’वादळ आले. त्यातच मुंबई ते मांडवा ही बोटसेवादेखील अद्याप अनियमित आहे. त्यामुळे पर्यटक फारच कमी प्रमाणात येत आहेत. त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होत आहे.
पर्यटक येत नसल्यामुळे समुद्रात वॉटर स्पोर्ट्सचा व्यवसाय करणारे अगदी मेटाकुटीला आले आहेत. घरगुती खानावळी चालवणारेही नाखूश आहेत. हॉटेल व्यवसायदेखील खालावला आहे. अनेक पर्यटकांनी केलेले आगाऊ आरक्षणदेखील रद्द केले. कॉटेजेसदेखील रिकाम्या आहेत.पर्यटकांची संख्या रोडावल्याने याचा फटका स्थानिकांनाही बसत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper