मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेचा रविवारी (दि. 29) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेला कोरोनासदृश लक्षण आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. त्यानंतर कोरोना तपासणीत तिला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कोरोनामुळे मुंबईत मृत्यू झालेल्यांची संख्या आता सात झाली आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा आकडा वाढत असताना मृतांची संख्याही धिम्या गतीने वाढू लागली आहे. यात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झालेल्या मुंबईत रविवारी आणखी एकाचा बळी गेल्याची माहिती समोर आली. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती दिली.
कोरोनामुळे एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. या महिलेला शनिवारी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला उच्च रक्तदाबासह श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. त्यानंतर तिला रुग्णालयात आणण्यात आले. या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. रविवारी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे चिंता व्यक्त होतेय.
बुलडाण्यातही एकाचा मृत्यू
बुलडाणा : कोरोनाचे
संकट आता शहरातून खेड्यापर्यंत पोहोचले आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात
आयसोलेशन कक्षात शनिवारी
(दि. 28) सकाळी ठेवण्यात आलेल्या एका 46 वर्षीय
व्यक्तीचा अवघ्या तासाभरातच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचा
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी राज्यात आतापर्यंत बळींची
संख्या आठ झाली आहे.