लॉकडाऊन पूर्णपणे उठणार नसल्याची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात फैलावत असलेले कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 8) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठकीत चर्चा केली. या वेळी पंतप्रधानांनी 14 एप्रिलनंतर पूर्णपणे लॉकडाऊन हटवला जाणार नाही, असे स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पंतप्रधान मोदींनी या बैठकीत सरकारद्वारे कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली तसेच इतर नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी लॉकडाऊन एका झटक्यात संपवता येऊ शकत नाही तसेच कोरोनापूर्वी आणि नंतरच्या परिस्थितीत अनेक बदल झालेले असतील, असे म्हटले. विशेष म्हणजे पंतप्रधान हे लॉकडाऊन संपण्यापूर्वीच म्हणजे 11 एप्रिल रोजी पुन्हा एकदा सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
‘राज्य सरकारमध्ये असमन्वय’
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बुधवारी जनतेशी संवाद साधला, मात्र लॉकडाऊन वाढणार की नाही याबाबत त्यांनी कोणतेही संकेत दिले नाहीत. दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यात समन्वय नसल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.